भारतातून नवरा अरविंदला सोडून पाकिस्तानात पोहचलेल्या अंजूने धर्म बदलला असून तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहशी निकाह केला अशी बातमी आता समोर आली आहे. खैबर पख्तनुख्वा या ठिकाणी या दोघांनी निकाह केला आहे. एवढंच नाही तर निकाहाच्या आधी अंजूने इस्लाम स्वीकारला असून तिने नावही बदललं आहे तिने स्वतःचं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे. फातिमाने तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहशी निकाहही केला आहे असं वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या न्यायालयात निकाह

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार धर्म बदलल्यानंतर अंजूने तिचं नाव आता फातिमा ठेवलं आहे. त्यानंतर जिल्हा न्यायालयात नसरुल्लाह आणि अंजू उर्फ फातिमाने निकाह केला. मालकुंड विभागाचे डीआयजी नासिर महमूद दस्ती यांनी अंजू उर्फ फातिमा आणि नसरुल्लाह या दोघांनी लग्न केल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

निकाह झाल्यानंतर फातिमाला पोलीस बंदोबस्तात तिच्या सासरी पाठवणण्यात आलं आहे. अंजू उर्फ फातिमाने सोमवारी असा दावा केला होता की ती इथे तिच्या बॉय फ्रेंडला भेटायला आली आहे आणि २० ऑगस्टला परत येणार आहे कारण तेव्हा तिचा व्हिसा संपतो आहे. एवढंच काय तर नसरुल्लाहनेही पीटीआयला हे सांगितलं होतं की आमच्यात अफेअर वगैरे काहीही नाही. तसंच अंजूशी लग्न करण्याचा कुठलाही विचार नाही. मात्र त्यानंतर ही बातमी समोर आली आहे. २०१९ पासून अंजू उर्फ फातिमा आणि नसरुल्लाह हे फेसबुकवर एकमेकांचे फ्रेंड्स आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

अंजूच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

“अंजू जयपूरला जाते हे सांगून पाकिस्तानला गेली हे मला सोमवारी कळलं आहे. माझा मुलगा डेव्हिडने मला सांगितलं की दीदी (अंजू) पाकिस्तानला गेली. मला याबाबत काही माहिती नाही. तिचं लग्न झाल्यापासून म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून आमचा फारसा संपर्क नाही. लग्नानंतर ती भिवाडी या ठिकाणी पतीसह राहते आहे. तर मी मध्य प्रदेशातल्या गावात वास्तव्य करतो. एवढंच नाही तर अंजूचं मानसिक आरोग्य फारसं ताळ्यावर नसतं आणि ती विक्षिप्त आहे.”

माझा जावई अरविंद हा एकदम साधा माणूस आहे. अंजू मात्र विक्षिप्त आहे. तिचं तिच्या मित्राशी अफेअर वगैरे असेल असंही मला वाटत नाही. ती फक्त विक्षिप्तपणातून किंवा डोक्यात एक सणक आली म्हणून त्याला भेटायला गेली असेल एवढं मी खात्रीने सांगू शकतो असंही थॉमस यांनी सांगितलं आहे. मी तिच्या विक्षिप्त स्वभावामुळेच तिच्याशी फारसा संपर्कात नसतो असंही अंजूच्या वडिलांनी सांगितलं.

काय आहे हे प्रकरण?

अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपण आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian woman anju marries facebook friend in pakistan converts to islam and changed name as fatima said report scj