काही दिवसांपूर्वीच अडनावामुळे नोकरी मिळत नसल्याची तक्रार करणारी एका महिलेची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. भारतामध्ये अपशब्द म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दाशी साधर्म्य साधणारे अडनाव असल्याने आपल्याला नोकरी मिळवताना अडचण येत असल्याचे या माहिलेने म्हटले होते. या पोस्टमुळे भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल किती गैरसमज आहेत यासंदर्भातील चर्चा ऑनलाइन माध्यमावर सुरु झाली. अशे असतानाच आता केवळ नावावरुन जगातील १०० नामांकित विद्यापिठांपैकी एक असणाऱ्या स्वीडनमधील ‘Lund University’ ला ट्रोल केलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतामध्ये हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जात असला तरी स्वीडीश भाषेत याचा अर्थ हिरवळीचा प्रदेश असा होतो. याचसंदर्भात विद्यापिठाच्या सोशल नेटवर्किंग पेजवरुनही एक पोस्ट करण्यात आली आहे.

अनेकदा ट्रोल झाल्यानंतर विद्यापिठाच्या पेजवरुन ठराविक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट करण्यात आली असून विद्यापिठाच्या पेजवर कमेंट करुन मित्रांना टॅग करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. “मागील १० वर्षांपासून आम्ही हे फेसबुक पेज चालवत आहोत. मात्र अनेकदा काही देशांमधील विद्यार्थी या पेजवर अचानक कमेंट करुन आपल्या मित्रांना टॅग करतात.  काही देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आमच्या विद्यापिठाचे नाव हे मनोरंजनाचे साधन झालं आहे. जगभरामध्ये हजारो भाषा आहेत. त्यामुळेच एकाच शब्दाचे दोन वेगळे अर्थ निघू शकतात. Lund हे दक्षिण स्वीडनमधील एका छोट्या शहराचे नाव आहे. या शब्दाचा अर्थ हिरवळ असणारा प्रदेश असा होतो. तुम्ही तुमच्या भाषेत याचा जसा उच्चार करता त्याहून फारच वेगळ्या पद्धतीने स्वीडीश भाषेत या शब्दाचा उल्लेख केला जातो. या विद्यापिठाचे नाव त्याच शहरावरुन ठेवण्यात आलं आहे. हे जागतिक स्तरावरील संशोधनाशी संबंधित नमांकित विद्यापीठ असून याची स्थापना १६६६ साली झाली आहे. हे जगातील अव्वल १०० विद्यापिठांपैकी एक आहे. जगभरातील विद्यार्थ्यांना या विद्यापिठासंदर्भातील माहिती मिळावी म्हणून हे फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. या पेजच्या माध्यमातून येथे येऊ इच्छिणारे विद्यार्थी त्यांचे प्रश्ना विचारु शकतात. आम्हाला दरवर्षी १७० हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. जर तुम्ही विद्यापिठामध्ये दाखल घेणारे विद्यार्थी नसाल तर तुम्ही कमेंट थेट तुमच्या मित्राच्या पोस्टमध्ये करुन तिथे या विद्यापिठाच्या नावासंदर्भात चर्चा करा. आम्हाला येथे रोज शेकडो कमेंट डिटील कराव्या लागत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर या विद्यापिठामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांच्याशी संवाद साधताना या कमेंटमुळे अडथळा येत आहे,” असं विद्यापिठाने त्यांच्या अधिकृत पेजवरुन म्हटलं आहे.


विद्यापिठाने केलेली ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी या विद्यापिठाची माफी मागितली असून नावावरुन मस्करी करणाऱ्यांनी वेळीच सुधरण्याची वेळ असल्याचे मत पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.



यापूर्वीही अनेकदा विद्यापिठाने अशाप्रकारे कमेंट आणि पोस्टच्या माध्यमातून फेसबुक पेजवर येऊन स्पॅमिंग करु नये अशी विनंती खास करुन दक्षिण आशियामधील  देशांमधील विद्यार्थ्यांना केली होती. या देशामध्ये विद्यापिठाच्या नावाचा वेगळाच अर्थ काढला जात असल्याने अशी विनंती करण्यात आली होती. आता पुन्हा अशाच प्रकारची पोस्ट विद्यापिठाने केल्याने हा विषय चर्चेत आला आहे.

Story img Loader