अनेक भारतीय विद्यार्थी लंडन, इंग्लंड येथील काही नामांकित विद्यापीठांत आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातात. मग तिथे कुठेतरी अर्धा दिवस काम करून, ते स्वत:चा खर्च भागवण्याचा प्रयत्न करतात. त्यात लंडन हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशातील सर्वांत लोकप्रिय शैक्षणिक ठिकाणांपैकी एक आहे. पण, या देशात राहण्यासाठी भारतीयांना खूप जास्त खर्च येतो. भारतात कोणीही दरमहा १० हजारांच्या पगारात जगू शकतो. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो; परंतु लंडनमध्ये राहण्यासाठी सरासरी खूप जास्त खर्च येतो. त्यामुळे लंडनमध्ये राहताना अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांना पैशांची बचत करावी लागते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; जो पाहून तुम्हालाही खरेच अनेक भारतीय परदेशात साधेपणाने राहतात हे पाहून आश्चर्य वाटेल.
लंडनच्या रस्त्यावर दोन भारतीयांचा सायकलने प्रवास
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लंडनमध्ये राहणारे दोन भारतीय सायकलवरून ऑफिसला जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे; तर त्याचामागे त्याचा मित्र बसलेला आहे. दोघेही एका सायकलवर बसून ऑफिस गाठत आहेत. लंडनच्या रस्त्यावर दोन मित्रांना अशा प्रकारे सायकलवर जाताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भारतात ज्याप्रमाणे अनेक जण कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात, त्याच प्रकारे लंडनमध्ये राहणारे हे भारतीय सायकलचा वापर करीत आहेत. पण असे दृश्य परदेशातील लोकांसाठी फार नवीन आहे. पण, भारतीयांची परदेशातील ही ‘देसी स्टाईल’ अनेकांना आवडली आहे. त्यामुळे हा रस्ता लंडनचा आहे की नाही हे पाहण्यासाठी ते हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
अनेक सोशल मीडिया युजर्सचे असे मत आहे की, जीवनात काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्यावर इतर अनेकांनी म्हटले की, भारतीय त्यांचे आरामदायी जीवन सोडून केवळ पैशासाठी परदेशात जात आहेत आणि अतिशय कठीण परिस्थितींचा सामना करीत काम करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, तुम्ही पाहू शकता, ही मुले पाच वर्षांत मोठ्या रेंजमध्ये बसून ड्रायव्हिंग करतील. मी २००६ मध्ये त्यांच्यापैकी एक होतो. ते घेत असलेली मेहनत पाहून त्यांचा मला अभिमान वाटतो. दुसर्या एका युजरने लिहिलेय की, ऐकले आहे की, काहीही सहज मिळत नाही? तुम्ही कुठे आहात याचा काही फरक पडत नाही. आपण सर्व प्रगतिशील काम करीत आहोत. कधीतरी त्यांच्याकडेही स्वतःची कार असेल. म्हणून कोणाला जज करू नका.