भारत हा मंदिरांचा देश आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अनेक जाती, धर्मांची लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत असतात. या प्रत्येक धर्मियांचे आपले असे प्रार्थनास्थळं, मंदिरं आहेत. या मंदिरांच्या बांधकाम शैलीपासून ते इतिहास, देवदैवत अशा शेकडोंनी कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. या देशात जिथे बॉलिवूडचे सुपस्टार अमिताभ बच्चन यांचे मंदिर असू शकते तिथे बाईकचेही एखादे मंदिर असले तर आश्चर्य वाटायला नको. तेव्हा अशाच एका आगळ्यावेगळ्या बुलेट बाबांच्या मंदिरांचे दर्शन तुम्हाला घडवणार आहोत.
VIDEO : मृत आईला बिलगून दूध पीत होता चिमुकला, दृश्य बघून पोलिसांनाही अश्रू अनावर
सुगंधी अगरबत्ती, हार, फुले, नैवेद्य घेऊन येथे शेकडोंनी भाविक येतात. हे भाविक चक्क एका बुलेट मोटारसायकलची पूजा करतात. राजस्थानमधील जोधपुरमध्ये हे मंदिर आहे. चोटीला या ठिकाणी जाणा-या एका छोट्याशा वळणावर हे मंदिर आहे. जिथे एक बुलेट ठेवण्यात आली आहे. या रस्त्यावरून जाणारे प्रवाशी या बुलेटला फुलं आणि हार वाहून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करतात. या मोटारसायकलची पूजा करण्याबाबत एक कथा सांगितली जाते. १९८८ ची ही गोष्ट असेल. चोटीला गावात राहणारे ओमसिंह आपल्या बाईकवर स्वार होऊन या भागातून जात होते. पण या वळणावर असलेल्या एका झाडापाशी त्यांच्या अपघात झाला. दुस-या दिवशी पोलिसांनी पंचनामा करून त्यांची बुलेट पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवली. पण रात्री ही बुलेट पोलीस स्टेशनमधून गायब झाली. जेव्हा पोलिसांनी या बुलेटचा शोध घेतला तेव्हा अपघात झाला त्या ठिकाणी ती बुलेट सापडली. पहिल्यांदा आपल्यासोबत कोणीतीही मस्करी करत आहे असेच पोलिसांना वाटले म्हणून दुस-यादिवशी पोलिसांनी या बुलेटमधले पेट्रोल काढून घेतले आणि साखळीने ती बांधून ठेवली. पण दुस-यादिवशीही ती बुलेट गायब झाली. यावेळीही पोलिसांना ती अपघाताच्या ठिकाणी सापडली. तेव्हापासून ही बाईक तिथेच ठेवण्यात आली. पुढे गावकऱ्यांनी तिथे छोटेसे मंदिर बांधले.
या परिसरातून जाणारे अनेक जण या बुलेटची पूजा करतात. हे ओमसिंह राठौड म्हणजेच बुलेट बाबा त्यांना अपघातापासून वाचवतात अशी त्यांची मान्यता आहे. त्यामुळे याठिकाणी नतमस्तक होऊनच ते आपल्या पुढच्या प्रवासाला सुरूवात करतात.
वाचा : ५०० रुपयांच्या जुन्या नोटेपासून विद्यार्थ्याने केली विद्युत निर्मिती