यूट्यूबवर आपण अनेकदा जगभरात झालेले विमानांचे धक्कादायक लँडिंग पाहतो. यातले काही व्हिडीओ तर काळजात धडकी भरवणारे असतात. मुंबई विमानतळावर असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार ९ जून रोजी म्हणजेच रविवारी घडल्याचं सांगितलं जात असून त्यासंदर्भात डीजीसीएनं तातडीने कारवाईही केली आहे. या घटनेमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया या दोन विमान कंपन्यांच्या विमानांची एकमेकांशी धडक थोडक्यात चुकली असून त्यामुळे दोन्ही विमानांमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता!
नेमकं घडलं काय?
९ जून रोजी सकाळची ही घटना असल्याचा दावा सोशल मीडियावर युजर्सकडून केला जात आहे. यासंदर्भात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदोरहून आलेल्या इंडिगोच्या एका प्रवासी विमानाला मुंबई विमानतळावरील एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील कर्मचाऱ्यांनी लँडिंगची परवानगी दिली. त्यामुळे इंडिगोच्या विमानानं ठरवून दिलेल्या धावपट्टीच्या दिशेनं लँडिंग सुरू केलं.
हे विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात समोर दिसलेल्या दृश्यानं सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला!
इकडे इंडिगोचं विमान धावपट्टीवर उतरत असताना समोर त्याच धावपट्टीवरून काही अंतरावरून एअर इंडिया ३५० हे विमान उड्डाण घेत होतं! या दोन्ही विमानांच्या लँडिंग आणि टेक-ऑफमध्ये अवघ्या काही क्षणांचंच अंतर होतं. त्यामुळे ही वेळ थोडी जरी पुढे-मागे झाली असती, तर कदाचित या दोन विमानांची धडक होण्याची शक्यता होती.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. “जर एअर इंडियाला काही कारणास्तव उड्डाण रद्द करावं लागलं असतं तर काय झालं असतं?” असा प्रश्न एका युजरनं विचारला आहे.
तर इतर काही युजर्सनं ‘ही मुंबईसारख्या व्यग्र विमानतळावर घडणारी एक सामान्य बाब आहे’, असं म्हणत मुंबई विमानतळ प्रशासनाची पाठराखण केली आहे.
कोण म्हणतात मुले रडत नाही..! शेवटच्या दिवशी कॉलेजची पोरं ढसा ढसा रडलीत, पाहा VIDEO
DGCA नं दिले कारवाईचे आदेश!
दरम्यान, एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, डीजीसीएनं या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या वेळी ड्युटीवर असणाऱ्या एटीसी कर्मचाऱ्यांना तात्पुरतं वेळापत्रकातून हटवण्यात आलं आहे. तसेच, यासंदर्भात डीजीसीएकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.