केळीच्या पानांत, सोन्या- चांदीच्या ताटांत, चीनी मातीच्या चकचकीत अन् गुळगुळीत ताटांत हॉटेल्समध्ये जेवण वाढलेले तुम्ही पाहिले आहे पण एक अजब गजब हॉटेल असेही आहे जिथे शौचालयाच्या कमोडमध्ये जेवण वाढले जाते. कदाचित तुम्हाला वाचून किसळवाणे वाटत असले तरी इंडोनेशियामध्ये ‘जंबान कॅफे’ नावाचा कॅफे आहे जिथे खाद्यपदार्थ हे कमोडमध्ये वाढले जाते. इतकेच नाही तर या हॉटेलला भेट देणा-या प्रत्येक ग्राहकाला कमोडवरच बसवले जाते. कमोडचा वापर खुर्च्यांसारख्या येथे केला जातो.
जगातल्या सगळ्यात अजब गजब हॉटेल्समध्ये या कॅफेचे नाव अग्रस्थानी आहे. कदाचित कमोडमध्ये जेवण वाढले जाते हे ऐकून येथे ग्राहक येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज चुकीचा आहे. इंडोनेशियातलेच नाही तर जगातले अनेक लोक या अजब गजब हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येतात. या हॉटेलची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता फक्त काहीच लोकांना येथे येण्याची परवानगी आहे. जंबानचा इंडोनेशिअन भाषेत अर्थ होतो शौचालय. इंडोनेशियातील अनेक भागांत शौचालय नाहीत. त्यामुळे लोकांनी शौचलयाचा अधिक वापर करावा यासाठी जनजागृती म्हणून आपण अशा प्रकारचे हॉटेल उघडल्याचे मालकाने सांगितले आहे. या हॉटेलवर इंडोनेशियामध्ये सुरूवातील खुपच टीका झाली. इस्लाम धर्मांची मुल्ये या हॉटेलने पायदळी तुडवली आहेत असे आरोपही यावर झाले पण या हॉटेलची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतेच आहे. तैवान आणि रशियामध्ये देखील अशा प्रकारचे हॉटेल आहे.