प्रत्येकजण वाहन चालवायला शिकतो. अनेकजण वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातील बऱ्याच जणांना वाहन चालवण्याचा परवानादेखील मिळतो. इंदूरमध्ये राहणाऱ्या विक्रम अग्निहोत्रींनादेखील वाहन चालवण्याचा परवाना मिळाला. कदाचित यामध्ये तुम्हाला काही वेगळे वाटणार नाही. यात काय विशेष आहे ?, असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. मात्र विक्रम अग्निहोत्रींना वाहन चालवण्याचा परवाना ही घटना महत्त्वाची आहे. कारण विक्रम अग्निहोत्रींना हात नाहीत. विक्रम पायांनी गाडी चालवतात. पायाने गाडी चालवणारे आणि परवाना मिळवणारे बहुधा विक्रम हे पहिलेच असावेत.
दोन्ही हात नसणे, हे विक्रम अग्निहोत्रींच्या जगण्याच्या कधीही आड आले नाही. विक्रम प्रेरणादायी वक्ते आहेत. शिवाय सध्या ते एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. स्वत:ची गॅस एजन्सी चालवत विक्रम या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. दररोजच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या कामांसाठी आपण कोणावरही अवलंबून असू नये, असे विक्रम यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी गाडी शिकण्याचा निर्धार केला. उजव्या पायाने स्टिअरींग विल आणि डाव्या पायाने ऍक्सिलेटर सांभाळत विक्रम अग्निहोत्री त्यांची ऑटोमॅटिक गिअरची गाडी चालवतात.
विक्रम अग्निहोत्रींनी ऑक्टोबर २०१५ मध्ये वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र ‘इतर गाड्यांना हाताने द्यायचे सिग्नल तुम्ही देऊ शकत नाही’, हे कारण देऊन विक्रम यांना परवाना नाकारण्यात आला. तेव्हापासून विक्रम वाहन परवान्यासाठी सतत प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पाठपुरावा केला. अखेर विक्रम यांच्या प्रयत्नांना यश आले.
अनेकांना वाहन चालवण्याची भीती वाटते. अनेकांना कार व्यवस्थित चालवणे जमत नाही. विक्रम अग्निहोत्री यांची कहाणी या सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अग्निहोत्री यांनी इंदूरमध्ये आतापर्यंत 14,500 किलोमीटरचा प्रवास गाडीतून केला आहे. यामध्ये त्यांच्याकडून कोणताही अपघात झालेला नाही. लेहपर्यंत गाडीने प्रवास करण्याचे विक्रम अग्निहोत्री यांचे स्वप्न आहे. आयुष्यात लहानसहान संकटांना सामोरे जाताना डगमगणाऱ्या सगळ्यांसाठीच विक्रम यांचा जीवनरुपी संघर्ष खूप काही शिकवणारा आहे.