भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष “आनंद महिंद्रा” विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पोस्टमधून व्यवसाय, आर्थिक व जीवन याबद्दल अनेक प्रेरणादायी तसेच अनेक कौतुकास्पद गोष्टी शेअर करत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये एक अनोखी बाजू दिसते, तर आज त्यांनी वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा (Wildlife photography) एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे , ज्यात प्राण्यांचे काही अविस्मरणीय क्षण कैद करण्यात आले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वन्यजीव छायाचित्रणाद्वारे काही अद्भुत क्षण दाखवण्यात आले आहेत. जंगलात खारुताई आणि उंदीर या प्राण्यांचे काही खास क्षण कॅमेरात फोटोग्राफरने कैद केले आहेत. जसे की, उंदीर चेरी फळ खाण्याचा आनंद घेत आहे. यादरम्यान त्याचे काही फोटोज काढण्यात आले आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, खार जंगलात एक पिवळ्या रंगाचे फूल खाते आहे, त्यावेळी फोटोग्राफरने तिच्या जवळ एक छोटा माईक धरला आहे; त्यातून खार फूल कशाप्रकारे चघळते हे स्पष्ट ऐकू येत आहे. वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा हा सुंदर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
आनंद महिंद्रांनी ‘जादुई प्राणी’ अशी दिली उपमा :
आनंद महिंद्रा यांची प्रत्येक पोस्ट एखादा संदेश देणारी असते. तर आज त्यांनी वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा व्हिडीओ पाहून प्राण्याच्या कौशल्याचे वर्णन केले आहे आणि ‘आपण सावकाश चाललो आणि अगदीच बारकाईने पाहिलं तर रोज आपल्या आजूबाजूला असे ‘जादुई प्राणी’ दिसतील’, असे त्यांनी लिहिलं आहे. ‘ज्युलियन रॅड’ या फोटोग्राफरने वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा हा व्हिडीओ त्याच्या कॅमेरामध्ये शूट केला आहे, ज्यात प्राण्याची एक अनोखी बाजू दाखवण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ तुम्हालाही काही क्षण थांबून बघण्यास नक्की भाग पाडेल.
आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट त्यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये प्राण्याची अनोखी बाजू दाखवली, यासाठी फोटोग्राफरची प्रशंसा केली आहे. तसेच अनेक जण हा व्हिडीओ पाहून, ‘सुंदर’, ‘खरी जादू’, ‘प्राण्यांमध्ये लपलेलं सौंदर्य’ अशा शब्दांत फोटोग्राफरचे कौतुक करत आहेत. फोटोग्राफरने आपल्या कौशल्याने प्राण्यांमधील लपलेलं सौंदर्य सर्वांसमोर व्हिडीओद्वारे आणले आहे, असे म्हणायला हरकत नाही.