भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक केंद्रीय करारात सामील असलेल्या महिला खेळाडूंना सर्व पुरुष खेळाडूं इतकेच मानधन मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. याचबरोबर सहा लाख आणि १५ लाख या दोन रकमांचीही सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या अगोदर १५ लाख या रक्कमेचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाशी लावला जात होता. आता पुन्हा एकदा ही रक्कम चर्चेत आल्याचे दिसत आहे.
पुरुषांना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. आता हीच रक्क महिला खेळाडूंनाही मिळणार आहे. ‘भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुषांच्या संघाइतके समान मानधन दिले जाईल. कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख आणि आंतरराष्ट्रीय टी 20 साठी ३ लाख रुपये मिळतील. वेतन समानता ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी अपेक्स काऊंसिलचे आभार मानतो.’ असं शाह यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
जय शाह यांच्या या निर्णयानंतर ६ लाख(INR 6) आणि १५ लाख (INR 15) या दोन रकमा ट्रेडिंगमध्ये दिसून येत आहेत. याशिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने एक पाऊल, खरोखर एक चांगली सुरुवात, महिला क्रिकेटसाठी आनंदाची बातमी… अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.
सचिव जय शाह यांच्या मोठ्या घोषणेवर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आभार देखील मानले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया म्हटले की, “महिला आणि पुरुषांसाठी वेतनाच्या समानतेच्या निर्णयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी खरोखरच आनंदाचा दिवस आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार”, अशा आशयाचे ट्विट करून हरमनप्रीत कौरने आभार मानले आहेत.