केवळ रुप, रंग, पैसा पाहून प्रेम करायचं नसतं. तर समोरच्या व्यक्तीच्या मनाचाही विचार करायचा असतो. प्रेमाची व्याख्या हिच तर आहे. मुंबईत राहणाऱ्या या तरूणाने अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिताशी लग्न करून जगाला हे दाखवूनच दिलं. खरं तर अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या मुलींना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारायला कोणी तयार नसतं, पण या जगात काही लोक असेही असतात की ज्यांना बाह्यसौंदर्यापेक्षा मनाचा मोठेपणा जास्त महत्त्वाचा वाटतो, मालाडमध्ये राहणारा रविशंकर त्यातलाच एक! अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिताशी विवाह करून त्यांनी वेगळं उदाहरण समाजापुढे ठेवलं. ललिता आणि रविशंकर यांची प्रेमकहाणीही थोडी वेगळी आहे.
असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळल्या जातात, पण आताच्या युगात या दोघांच्या रेशीमगाठी जुळल्या त्या मोबाईलमुळे. एका राँग नंबरमुळे ललिता रविशंकरच्या संपर्कात आली. पण याच राँग नंबरने तिला आयुष्याचा ‘राईट’ जोडीदार दिला. ठाण्यातील कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारी ललिता बन्सी ६ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मामाच्या घरी गेली होती. मामाच्या मुलाबरोबर तिचा किरकोळ वाद झाला. ललितासोबतच्या झालेल्या वादाचा राग डोक्यात ठेवून मामाच्या मुलाने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रुप केला. या घटनेनंतर ललितावर उपचार करण्यात आले आणि ती पुन्हा वाघोबा नगर येथे राहायला आली. मुंबईला वास्तव्यास आल्यानंतर मालाड येथे राहणाऱ्या रविशंकर याच्या मोबाईलवर तिने चुकून कॉल केला. पण हा चुकीचा कॉल तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
दोघांची एकमेकांसोबत मैत्री झाली. हळूहळू मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र, अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यामुळे प्रेम व्यक्त करणं ललिताला अवघड वाटू लागलं. कदाचित रविशंकर आपल्याला स्वीकारणार नाही याची भीती तिला वाटत होती. पण त्याच्यावरचं प्रेमही लपवता येत नव्हतं. शेवटी धाडस करून तिने आपल्या प्रेमाची कबुली रविसमोर दिली. अन् रविनेही तिचा स्वीकार केला. त्यावेळी रविच्या तोंडून निघालेल्या ‘मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या रुपावर नाही’ या वाक्याने तिचा आयुष्याला नवी उमेद मिळाली. आज या दोघांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. ठाण्यातील रजिस्ट्रेशन कार्यालयात साहस फाऊंडेशनच्या पदाधिकारी आणि संस्थेच्या अध्यक्षा दौलत बी. खान यांच्या साक्षीनं हा विवाह संपन्न झाला. अभिनेता विवेकने ओबेरॉयने देखील या लग्नाला उपस्थिती लावली विशेष म्हणजे लग्नानंतर ललिताच्या चेहऱ्यावरील प्लॅस्टिक सर्जरीचा संपूर्ण खर्च विवेक ओबेरॉय करणार आहे.