Israel-Palestine War: इस्त्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन युद्धामुळे मृत्यूतांडव सुरु आहे. भारत, यूएससह अनेक देश इस्त्रायलच्या मदतीला धावून गेले आहेत. पण वारंवार व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील हिंसाचार हे इस्त्रायलच्या जनतेची हतबलता दाखवत आहेत. मागील काही दिवसांमध्ये तर युद्धामुळे महिलांच्या विरुद्ध अत्यंत लज्जास्पद अशा घडामोडी इस्त्रायलमध्ये घडत आहेत. अशावेळी खरोखरच स्त्रीशक्तीची साक्ष पटवून देणारी एक घटना इस्त्रायलच्या एका गावातून समोर येत आहे. एका २५ वर्षीय इस्त्रायली महिलेने तिच्या बुद्धी, हिंमत व गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पॅलेस्टिनी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीपासून अगदी जवळ असणाऱ्या सडेरोट मधील ही कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.
प्राप्त माहितीनुसार, किबुट्झ नीर अॅमच्या सुरक्षा समन्वयक, इनबार लिबरमन यांना ७ ऑक्टोबरला गावामध्ये काही स्फोट ऐकू आले. गावावरील नेहमीच्या रॉकेट हल्ल्यांदरम्यान ऐकू येणाऱ्या आवाजांपेक्षा हे आवाज वेगळे असल्याचे त्यांना जाणवले.
अशावेळी गोंधळून- घाबरून जाण्याऐवजी त्यांनी गावातील शस्त्रागारातील बंदुका रहिवाशांच्या हाती देत स्वतः सुद्धा लढण्यासाठी मैदानात उडी घेतली. न्यू यॉर्क पोस्टनुसार, लीबरमनने काही पॉईंट्स सेट केले आणि १२ सदस्यांच्या सुरक्षा पथकाने हमासच्या सैनिकांवर हल्ला चढवला यामध्ये त्यांनी स्वतः पाच दहशतवाद्यांना संपवले. इस्त्रायली सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत सुमारे तीन तास ही लढाई सुरु होती.
Nir Am चे सांस्कृतिक समन्वयक इलिट पाझ यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले की, “हल्ला हा आश्चर्याचा धक्काच होता. माझे पती स्टँडबाय युनिटचा भाग होते ज्याने आजवर अनेक हल्ल्यांमध्ये कामगिरी केली आहे. आम्ही सुद्धा शॉट्स ऐकले आणि स्टँडबाय युनिटच्या इतर सदस्यांशी आणि इनबालशी संपर्क साधला. तेव्हा आम्हाला स्टँडबायवर राहण्यास सांगितले होते. पण इन्बालने वाट न पाहता लगेचच हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आणि यामुळेच आमच्या गावकऱ्यांचे प्राण वाचू शकले.”
इस्त्राईलच्या X (पूर्व ट्विटर) खात्याने लीबरमनच्या कर्तबगारीचे कौतुक केले आणि त्यांच्यामुळेच “संपूर्ण किबुट्झ वाचले” असं म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ११ ऑक्टोबर रोजी पाचव्या दिवशीही तितकेच ज्वलंत स्वरूपात सुरु होते. इस्रायलने हमासच्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये अन्न, इंधन आणि औषधांचा प्रवेश बंद केला आहे. दोन्ही बाजूंनी किमान २१०० लोक मारले गेले आहेत तर युद्ध आणखी वाढण्याची भीती आहे.
अल जझीराच्या माहितीनुसार, युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्यूज इन निअर ईस्ट (UNRWA) ने सांगितले की, गाझामधील त्यांच्या शाळांमध्ये आश्रय घेतलेल्या १ लाख ८० हजाराहून अधिक लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे दोन आठवड्यांपेक्षा कमी अन्न आणि पाणीपुरवठा आहे.