आयटीमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून नव्याने काही व्यवसाय सुरु करणे म्हणजे खऱ्या अर्थाने धाडसच. आयटी कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. मात्र आपल्यामध्ये याहून अधिक जास्त क्षमता आहे हे माहित असलेल्या रॉड्रीक्स यांनी हातात असणाऱ्या नोकरीवर पाणी सोडले आणि व्यवसायात उडी घेतली. आजूबाजूचा प्रत्येक जण त्यांना वेड्यात काढत असताना त्यांचा मात्र स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक यशस्वी आयटी सल्लागार असलेल्या रॉड्रीक्स यांनी कॉम्प्युटर पार्ट्स विकण्याचा व्यवसाय सुरु केला. विशेष म्हणजे या व्यवसायातील कोणतीही माहिती नव्हती मात्र त्यांच्याकडे होतं जिद्दीचं भांडवल. नोकरी सोडून व्यवसाय करण्याच निर्णय घेतला असला तरीही कुटुंबातील व्यक्तींची समजूत काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. आपण जे काही करतो त्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला हवा हे एकच ध्येय घेऊन त्यांनी आपल्या नव्या कामाला सुरुवात केली.

एकटेपणा घालविण्यासाठी आजोबांनी शोधला हा मार्ग

सुरुवातीचे काही महिने त्यांनी विविध गोष्टींवर अक्षरशः वेड लागल्यासारखे संशोधन केले. त्यानंतर मोबाईल फोन आणि लॅपटॉप कंट्रोल करु शकेल अशी सॉफ्टवेअर सिस्टीम बनवायची कल्पना अचानक त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी त्यादिशेने आपले काम सुरु केले. आपल्या या प्रकल्पाला त्यांनी सोटी असे नाव दिले. हे काम सुरु असतानाच रॉड्रीक्स यांना युरोपमधील मोठ्या सुपरमार्केट ग्रुपमधून फोन आला. त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर सिस्टीमविषयी प्रशिक्षण द्यायचे होते. त्यासाठी त्यांना रॉड्रीक्स यांच्या कंपनीची मदत हवी होती. या फर्मने थेट २० हजार युनिट्सची मागणी केली. त्यानंतर ‘सोटी’ ने मागे वळून पाहिले नाही. सोटी कंपनी मोबाईल टेक्नोलॉजी सिस्टीम ग्राहकांना देण्याऐवजी ते थेट कंपन्यांनाच देत. नव्या प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारे अर्थिक सहाय्य रॉड्रिक्स यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने उभे केले. त्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीकडूनही विचारणा झाली.

Viral : कुणाच्या सांगण्यावरून कारची काच खाली करताय? हा व्हिडिओ पाहाच!

पाकिस्तानात जन्मलेल्या रॉड्रीक्स यांचे पूर्वज गोव्यातील पोर्तूगल कॉलनीत राहायचे. ते ११ वर्षाचे असताना नातेवाईक आणि पालकांसोबत कॅनडात स्थायिक झाले. शालेय शिक्षण झाल्यानंतर रॉड्रीक्स यांनी कॉम्युटर सायन्स आणि मॅथेमॅटीक्समध्ये टोरांटो विद्यापीठातून पदवी घेतली. तळघरापासून व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या रॉड्रीक्स यांचे टॉरांटो आणि कॅनडाच्या बॉर्डरला दोन इमारतींमध्ये कंपनीचे मुख्यालय आहे. इतरांनी वेड्यात काढले तरीही आपण आपल्या ध्येयाशी ठाम असून तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे रॉड़्रीक्स यांनी दाखवून दिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspiring story of man who leave it job and set his own business become millionaire