काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक तरुणांना आपल्या सौंदर्याने भुरळ घातलेली नेपाळची भाजीवाली म्हणजेच तारकरीवालीला शोधण्यात अखेर यश मिळाले. रुपचंद्र महारन नावाच्या फोटोग्राफरने नेपाळच्या पुलावर भाजी विकणा-या तरूणीचा फोटो काढला होता, गेल्या आठवड्याभरापासून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर बीबीसी नेपाळने या मुलीला शोधून काढले.

या मुलीचे नाव आहे कुसुम श्रेष्ठा, अठरा वर्षे वय असलेली कुसुम ही महाविद्यालयात शिकते. मुळची चितवन जिल्ह्यात राहणारी कुसुम ही शेतकरी कुटुंबात जन्मली. महाविद्यालयाला सुट्ट्या पडल्यानंतर ती आई वडिलांना भाजी विकण्याच्या व्यवसायात मदत करते. आपला फोटो इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याची पुसटशी कल्पनाही कुसुमला नव्हती. तिच्या एका मैत्रिणींकडून तिला हे समजले. कुसुमला नर्स व्हायचे आहे पण तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही अशी भिती कुसुमला सतावते.

कुसुमला व्हायरल झालेल्या फोटोंबद्दल विचारले असता आपले फोटो कधी घेतले, हेच कळले नसल्याचे तिने सांगितले. व्हायरल झालेले फोटो एका मैत्रिणीने फेसबुकवर दाखवले असता आपल्याला यावर विश्वासच बसत नसल्याचेही ती म्हणाली. ‘हे फोटो बघून तुला जर मॉडेलिंगची ऑफर दिली तर तू करशील का ? अशा प्रश्नही तिला आता विचारण्यात आला. ‘काम मिळाले तर नक्की विचार करेन पण मॉडेलिंगपेक्षा नर्स बनणे माझे खरे स्वप्न असेल’ असेही ती म्हणाली. काही दिवसांपूर्वी अर्शद खान नावाच्या पाकिस्तानी चहावाल्याचा फोटोही व्हायरल झाला होता. अर्शदच्या फोटोंची सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली की एका मॉडेलिंग कंपनीने त्याला मॉडेलिंगची ऑफर देऊ केली.

Story img Loader