International Dog Day 2023: आपल्या जीवनातील कुत्र्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि कुत्र्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन (Dog Day) म्हणून साजरा केला जातो. आपल्या घराचा राखणदा, पोलिस किंवा सैन्यदलात काम करणारा, विश्वासू साथीदार, प्रशिक्षक व सहायक प्राणी म्हणून कुत्र्यांनी समाजात बजावलेल्या विविध भूमिकांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी कुत्र्यांसह अनेक प्राण्यांना भेदभाव, क्रूरता, निष्काळजीपणा आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्यांबाबत समाजात जागरूकता निर्माण करून, त्या रोखण्यासाठी व उपाययोजना सुचवण्याकरिता आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्तच्या उपक्रमांमध्ये कुत्र्यांची सुटका करणे, भटक्या कुत्र्यांना निवारा देणे, प्राण्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, पाळीव प्राण्यांच्या मालकीचे समर्थन करणे, भटक्या कुत्र्यांना सांभाळणे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.
आंतरराष्ट्रीय श्वान दिन कधी साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय श्वान दिन दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
- आंतरराष्ट्रीय श्वान दिन २०२३ ची थीम काय आहे?
आंतरराष्ट्रीय श्वान दिवस २०२३ ची थीम अज्ञात आहे. परंतु, हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना कुत्र्यांची निष्ठा आणि त्यांच्या सहवासाची जाणीव करून देणे, तसेच या मोहक कुत्र्यांवर प्रेम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
- आंतरराष्ट्रीय श्वान दिनाचा इतिहास
आंतरराष्ट्रीय श्वान दिनाची संकल्पना सर्वांत पहिल्यांदा २००४ मध्ये एक प्राणी कल्याण वकील व प्राणी वर्तनवादी कॉलिन पेगे यांनी मांडली होती. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे कुत्र्यांमुळे आपल्या जीवनात येणारा प्रेम, आनंद आणि त्यांचा आपणाला जो सहवास मिळतो, त्याचे कौतुक करणे; तसेच त्यांचा स्वीकार करणे हा आहे. कुत्र्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणे, तसेच त्यांचा संकटापासून बचाव करणे, त्यांना दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे हे पेगे यांचे हा दिवस सुरू करण्यामागचे ध्येय होते. आंतरराष्ट्रीय कुत्रा दिनाव्यतिरिक्त इतर अनेक प्राण्यांशी संबंधित सुट्या जसे की, राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस, राष्ट्रीय पिलांचा दिवस आणि राष्ट्रीय मांजर दिवस सुरू करण्याचे श्रेयदेखील कॉलिन पेगे यांना दिले जाते.
आंतरराष्ट्रीय श्वान दिनाचे महत्त्व –
आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा करण्याच्या मुख्य उद्देशात समावेश असलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे :
कुत्र्यांच्या बचावासाठी प्रोत्साहन देणे.
बेघर व भटक्या कुत्र्यांना दत्तक घेणे.
कुत्र्यांसारख्या प्राण्यांच्या कल्याणासाठी निधी उभारणी करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे.
प्राण्यांबाबत निष्काळजीपणा, प्राण्यांवर अत्याचार, प्राण्यांची क्रूरता यांसारख्या प्राण्यांच्या समस्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे.
हेही पाहा- तहानलेल्या कुत्र्याला पाणी पिण्यासाठी महिलेने केली मदत; व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत, ”दयाळूपणाची…”
- कुत्र्यांशी संबंधित प्रेरणादायी संदेश
मला कुत्र्यासारखे काम करायचे आहे, जे करण्यासाठी मी जन्माला आलो ते आनंदाने आणि उद्देशाने करायचे आहे. मला कुत्र्यासारखे पूर्णपणे, आनंदाने खेळायचे आहे.
- ओप्रा विन्फ्रे
कुत्रा सज्जन आहे; मला माणसाची नाही तर कुत्रा स्वर्गात जावा, अशी आशा आहे.
- मार्क ट्वेन
आयुष्यभर त्यांनी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अनेकदा अपयशी ठरला. शेवटी तो फक्त माणूस होता. तो कुत्रा नव्हता.
- चार्ल्स एम. शुल्झ
आपल्याला पाळीव प्राण्यांबरोबर इतकं लहान आयुष्य जगावं लागतं आणि यातील बहुतांश वेळ ते आपण घरी येण्याची वाट पाहण्यात घालवतात.
- जॉन ग्रोगन
कुत्रा ही एकमेव बाब अशी आहे; जी तुमचे तुटलेले हृदय जोडू शकते.
- जुडी डेसमंड