शहारांमध्ये राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. वाढतं भाडं ही विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरुणाईसमोरची मोठी अडचण आहे. चांगली खोली, पाणी, बाथरूम असणं ही कोणत्याही भाडेकरूची मागणी असते. छोट्याशा जागेसाठीही हजारो रुपयांचं भाडं अदा करावं लागतं. त्यामुळे अनेकजण पीजीमध्ये राहण्याचा पर्याय निवडतात. मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारख्या शहरात घराची भाडी परवडणाच्या पलीकडे गेली असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र अवघ्या एका चहाच्या किंमतीमध्ये महिन्याभरासाठी बाथरुम असलेली खोली मिळत आहे. कल्याणी एम्स येथे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या मनीष अमन याने एक्स या साईटवर आपल्या खोलीचे फोटो आणि त्याच्या भाड्याची रक्कम टाकली आहे. यानंतर इंटरनेटवर एकच खळबळ उडाली असून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काहीजण ही चक्क फसवणूक असल्याचं म्हणत आहेत.

अमनने एक्सवर त्याच्या खोलीचे फोटो पोस्ट केले आहेत. या खोलीत बाथरुम असल्याचंही त्यानं सांगितलं. तसेच त्याच्या महाविद्यालयानं ही खोली प्रदान केली असून त्यावर अनुदान दिलं असल्याचं त्यानं सांगितलं. खोलीत एक सिंगल बेड, अभ्यासाचं टेबल, बाथरुम दिसत आहे. अमननं फोटोसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, मला ही सिंगल खोली फक्त १५ रुपये मासिक भाड्यात मिळाली आहे.

हे वाचा >> मुंबईच्या रस्त्यावर बाईकस्वाराने केली शिवीगाळ, लहान मुलाबरोबर असलेल्या कारचालकाने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

या पोस्टनंतर एक्सवर हा ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. स्वप्नातही एवढ्या शुल्लक भाड्यात खोली मिळेल, याची अपेक्षा कुणालाच नाही. अनेकांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी अमन नशीबवान असल्याचं म्हटलं. एका एक्स युजरनं म्हटलं की, गुरुग्राम किंवा मुंबईत याच खोलीचं भाडं १२ हजारांपेक्षा कमी झालं नसतं. तर दुसऱ्या एका युजरनं गमतीनं म्हटलं की, मला एवढीच खोली मोफत मिळाली, जेव्हा मला अटक झाली होती.

हे ही वाचा >> तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

आणखी एक युजर म्हणाला की, मुंबईत १५ रुपयात तुम्हाला वडा पाव मिळेल. पण खोली मिळणार नाही. तर एका युजरनं म्हटलं, १५ रुपये मासिक भाडे? एवढ्या कमी पैशांत खोली मिळविण्यासाठी ७० दशकात जावं लागेल.

विशेष म्हणजे अमनने फोटोंसह या खोलीचा एक व्हिडीओही एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एका माणसाच्या वापरासाठी ही खोली पुरेशी असल्याचं तर दिसतं. त्याशिवाय खोलीतील फ्लोरींग आणि इतर कामही नीटनेटकं आणि सुबक असल्याचं लक्षात येतं.

काही जणांनी अमनला विचारलं की, इतकं कमी भाडं कस काय शक्य आहे? तर त्यावर अमन म्हणाला की, महाविद्यालयाने ५.५ वर्षांसाठी आमच्याकडून ५,८५६ रुपये घेतले होते. त्यातही १,५०० रुपये आम्हाला परत देण्यात आले आहेत. तसेच अमनने आणखी एक पोस्ट टाकून महाविद्यालयाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काची सर्व माहिती दिली आहे.

अमन म्हणाला, १५ रुपये मासिक भाड्यात खोली कशी मिळाली, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. तर माझ्या महाविद्यालयाचे एकूण शैक्षणिक शूल्क ४,३५६ इतके आहे. त्याहून एक रुपयाही अधिक आमच्याकडून घेतलेला नाही. या पोस्टसह त्याने टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा स्क्रिनशॉट जोडला आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर तयार करण्यासाठी एम्सकडून १.७ कोटी खर्च केले जात असल्याचं म्हटलं आहे. ही बातमी शेअर करत अमनने देशातील करदात्याचे आभार मानले.