महागाई दिवसेंदिवस वाढत जात असताना महिना संपेपर्यंत पगार उरत नाही, हे आता नोकरदारांची सामान्य तक्रार झाली आहे. ईएमआय, गुंतवणूक, घरखर्च आणि इतर खर्च भागवता भागवता नोकरदारांच्या नाकी नऊ येतात. सौरव दत्ता नावाच्या गुंतवणूकदारांने केलेल्या एका विधानामुळं तर नोकरदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या महाशयांनी एक्सवर पोस्ट टाकली. ज्यात म्हटले, “आजच्या तारखेला वर्षाला २५ लाख पगार मिळाला तरी तो काहीच नाही.” पण ही चर्चा सामान्य नोकरदारांची नाही तर सॉफ्टवेअर क्षेत्रातील पगाराबाबत होत आहे.
सौरव दत्ता यांचे म्हणणे असे होते की, आजच्या तारखेला वर्षाला २५ लाख पगार काहीच नाही. अगदी सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही यापेक्षा जास्त पॅकेज मिळते. तंत्रज्ञान क्षेत्रात मिळणारे पॅकेज बाजाराला चुकीच्या दिशेने नेत आहेत. सौरव दत्ता यांची पोस्ट अशावेळी आली आहे, जेव्हा आयटी उद्योगात मंदी सदृश्य परिस्थिती असून आधीच लोकांचे पगार रखडलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित लोकांनी या पोस्टवर तावातावने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सौरव दत्ता यांनी ही पोस्ट टाकून दोनच दिवस झाले आहेत. त्यावर अनेकांनी आपली मते नोंदवली आहेत. काहींनी दत्ता यांचे मत खोडून काढे आहे. यामध्ये १० वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे, ज्यांचा पगार आता कुठे २५ लाखांच्या पॅकेजच्या आसपास पोहोचला आहे.
एका युजरने म्हटले की, कोणती कंपनी नव्या लोकांना इतका पगार देते? मी अनेक आयटी इंजिनिअर मुलं-मुलींना ओळखतो ज्यांना १० वर्ष काम केल्यानंतर २५ लाखांचे पॅकेज मिळत आहे. कदाचित एक-दोन कंपन्याच काही फ्रेशर लोकांना एवढा पगार देत असाव्यात, पण मोठ्या कंपन्या नवीन लोकांना इतका पगार देत नाहीत. या कमेंटला उत्तर देताना सौरव दत्ता म्हणाले की, मागच्या काही वर्षांत चित्र बदलले असून पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांनाही ३० लाखांचं पॅकेज मिळत आहे.
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, जे लोक पटापट कंपन्या बदलतात, त्यांनाच इतका पगार लवकर मिळणे शक्य होते. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, करोना काळानंतर पगारात मोठी कपात होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर आयटी कंपन्या नोकर कपात करत आहेत. करोना पश्चात आता अनेकांना वास्तवाचे भान झाले आहे. तर चौथ्या एका युजरने म्हटले की, तुम्ही जो दावा केला, त्याला पुरावा म्हणून तुमच्याकडे कोणती आकडेवारी आहे?