सप्टेंबर महिना जवळ आला की वेध लागतात ते अॅपलच्या नव्या आयफोनचे. म्हणजे सप्टेंबर आणि अॅपलच्य़ा नव्या फोनची घोषणा हे मागील चार वर्षांपासूनचे समिकरणच झाले आहे. त्यामुळेच या काळात अॅपलच्या येणाऱ्या नव्या फोनच्या, त्याच्या फिचर्सच्या चर्चांना उधाण आलेलं असतं. असंच मागील काही माहिन्यांपासून अॅपलच्या येऊ घातलेल्या आयफोन ८ बद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. या फोनचे फिचर्स काय असतील, कसा असेल या फोनचा लूक, यांबाबत अंदाज व्यक्त करणारे लेख, फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेत . या फोनची कुठेतरी चाचणी सुरु असल्याच्या बातम्यांपासून हा आतापर्यंत बाजारात आलेल्या आयफोनपेक्षा आकाराने सर्वात मोठा फोन असेल अशा अनेक चर्चा रंगल्यात. मात्र या चर्चांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे अॅपलचे कार्यकारी अध्यक्ष टीम कूक यांच्याविषयीची. कूक स्वत: हा नवीन आयफोन वापरत असून त्याची चाचणी ते करत असल्याचे म्हटले जात आहे.
अचानक थेट टीम कूक हा नवीन फोन वापरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यामागे कारणही तसे खास आहे. ‘द वर्ज’ या वेबसाईटवरील एका पोस्टनुसार टीम कूक यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोवर ही चर्चा रंगली आहे. टीम कूक यांनी आपल्या टीमबरोबरचा फोटो पोस्ट करून अॅपलच्या फोनची चाचणी करणाऱ्या टीमला धन्यवाद म्हटले आहे. तसेच तुम्हाला भेटून आनंद झाल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. कूक यांच्या या मेसेजऐवजी चर्चा रंगलीय त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोची. या फोटोमध्ये अनेक नेटकऱ्यांनी टीम यांच्या पॅण्टच्या पुढच्या उजव्या खिशात एक मोठे फोनसारखे डीव्हाइस असल्याची शक्यता नेटकऱ्यांना आहे. आयफोनचे संभाव्य फिचर्स आणि आकारच्या चर्चांवर विश्वास ठेवला तर हा आयफोन आठ असण्याची शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी टीम यांच्या खिशाचा हा फोटो झूम करुन शेअर करत हा आयफोन ८ आहे का? असे ट्विट केले आहे. त्यामुळे टीम कूक स्वत: आयफोन ८ लॉन्च होण्याआधी तो वापरून त्याची चाचणी घेत आहेत अशी चर्चा आहे. पुढील महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अॅपल कंपनीकडून आयफोन ८ ची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Thanks to the team at CTS in Cincinnati, manufacturers of best-in-class testing equipment for Apple. Enjoyed my visit this morning! pic.twitter.com/lFLW5caYxw
— Tim Cook (@tim_cook) August 24, 2017