आयपीएलच्या इतिहासात आपला पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची मुंबई इंडियन्ससमोर खराब सुरुवात झाली. हैदराबादविरुद्ध सामन्यात दिल्लीने स्टॉयनिसला सलामीला पाठवत सर्वांना धक्का दिला. सुदैवाने हैदराबादविरुद्ध सामन्यात दिल्लीची ही रणनिती चांगलीच जमून आली. परंतू मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीचा हुकुमी एक्का सपशेल फेल ठरला. फॉर्मात असलेल्या मुंबईच्या ट्रेंट बोल्टने स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. अंतिम फेरीच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होण्याची ही पहिली वेळ ठरली.

मार्कस स्टॉयनिस अपयशी ठरला असला तरीही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरला ट्रोल करायला सुरुवात केली. हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना?? जाणून घ्या काय आहे कारण…

गौतम गंभीरने सामना सुरु होण्याआधी फँटसी लिग खेळणाऱ्यांना स्टॉयनिसला कर्णधार करण्याचा सल्ला दिला. आपणही त्याचीच निवड केल्याचं गंभीरने एका व्हिडीओ कार्यक्रमात सांगितलं. मात्र तोच फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे नेटकऱ्यांनी चुकीचा सल्ला देणाऱ्या गंभीरला ट्रोल करायला सुरुवात केली.

स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.

Story img Loader