आयपीएलचे सामने पाहण्यासाठी तुम्हीपण ऑनलाइन तिकीट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी वाचणे फार महत्त्वाचे आहे. कारण आयपीएलच्या बनावट तिकिटांशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. बेंगळुरूमधील एक महिला आयपीएल सामन्यासाठी ऑनलाइन तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. ऑनलाइन तिकीट शोधत असतानाच तिची नजर एका फेसबुक अकाउंटवर पडली, ज्यावर आयपीएल क्रिकेट तिकीट असे लिहिले होते. महिलेने क्रॉस चेक न करताच त्या अकाउंटमध्ये दिलेल्या एका मोबाइल नंबरवर फोन केला आणि त्यानंतर तिने जवळपास ८६,००० रुपये गमावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलच्या ऑनलाइन तिकिटांच्या नावे महिलेची फसवणूक

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका ४३ वर्षीय महिलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना स्टेडियममध्ये जाऊन लाइव्ह पाहायचा होता. यासाठी ती ऑनलाइन तिकीट शोधत होती. अशात तिची नजर आयपीएल क्रिकेट तिकीट नावाच्या एका फेसबुक अकाउंटवर पडली, या अकाउंटद्वारे बनवाट आयपीएल तिकीट विक्रीचा धंदा सुरू होता. महिलेने कसलाही विचार न करता त्या अकाउंटवर एका मोबाइल नंबरवर कॉल केला.

अशाप्रकारे झाली महिलेचे फसवणूक

महिलेने त्या नंबरवर कॉल करताच समोरील बनावट आयपीएल तिकीट विकणाऱ्या भामट्याने आपण आयपीएल तिकीट विकत असल्याचा दावा केला. त्याच्यावर विश्वास ठेवत महिलेने तिला २० तिकीटे हवी असल्याचे सांगितले. यावर त्या भामट्याने आता पैसे पाठवलेत तर तिकिटे मिळू शकतील असे म्हटले. तिकीट बुक करण्यासाठी त्याने महिलेकडून आठ हजार रुपये आगाऊ मागितले. तिने विशास ठेवून पैसे ट्रान्सफर केले.

यानंतर भामट्याने अजून ११ हजार रुपयांची मागणी केली. तिने लगेच ते पाठवले. यानंतर पुन्हा ८१७० रुपयांची मागणी केली, तिने तेही पाठवले. हे असे चालूच राहिले. त्याने नंतर पुन्हा १४,९९९ आणि नंतर २१,००० हजार रुपये महिलेकडून घेतले. २१००० नंतरही तिने अजून पैसे पाठवत राहिली, आपली फसवणूक होत आहे हे लक्षात न आल्याने महिला पैसे पाठवत राहिली.

यानंतर महिलेने तिकीट तरी द्या अन्यथा पैसे परत करा असे त्या व्यक्तीस सांगितले. पण, त्याने तांत्रिक अडचण असल्याचे सांगत अजून पैसे पाठवल्यानंतरच ते परत करू शकतो असे सांगितले. यावेळी अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने त्या व्यक्तीला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. पण, फसवणूक करणाऱ्या भामट्याने महिलेलाच उलट धमकावत फोन ठेवला. यानंतर दुसऱ्या दिवशी तिने पोलिसांत जाऊन तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत भारतीय दंड संहितेच्या दोन कलमान्वये गुन्हा दाखल केला.

त्यामुळे कोणतेही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl ticket scam alert woman loses rs 86000 trying to buy ipl tickets from facebook sjr