IPS Navniet Sekera Shared Funny Video : बालपण प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी आणि मजेदार काळ असतो; ज्यात कसलीही पर्वा न करता, फक्त मजा-मस्ती करणं हाच उद्योग असतो. मात्र, ही मजामस्ती करताना अनेकदा मुलं असे काही उद्योग करून ठेवतात; जे पालकांना निस्तारावे लागतात. अशा वेळी मुलं पालकांकडून खूप मार खातात. परंतु, काही वेळा ते सर्व गोष्टी विसरून जातात आणि त्याच त्याच चुका पुन्हा करू लागतात; ज्यामुळे ते पु्न्हा पालकांकडून मार आणि ओरडा खातात. पण, आता आपण मोठे झाल्यावर जेव्हा आपल्यासमोर एखादं लहान मूल खट्याळपणा करताना दिसतं त्यावेळी आपल्याला आपले बालपणीचे दिवस, केलेली मजा-मस्ती आठवू लागते. असाच काहीसा प्रकार एका आयपीएस अधिकाऱ्याबाबत घडला आहे. या अधिकाऱ्याचं नाव आहे नवनीत सिकेरा. देशातील सर्वांत पॉवरफूल आणि दबंग आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.
नवनीत सिकेरा यांनी सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे; जो खूपच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल पूर्णपणे चिखलात लोळून आल्याचं दिसतंय. त्याचे कपडे चिखलामुळे पूर्णपणे खराब झाले असून, अंगावर फक्त ओला चिखलच चिखल दिसत आहे. यादरम्यान, त्यानं एका हातात आपली पॅंट पकडली आहे; तर दुसऱ्या हातात चप्पल धरली आहे. त्यामुळे मुलाची काय अवस्था झाली आहे ते तुम्ही व्हिडोओमध्ये पाहू शकता. खेळता खेळता किंवा मासे पकडताना तो चिखलात पडला असावा, असं वाटतं; पण त्यानंतर घरी गेल्यानंतर त्याची काय अवस्था झाली असेल हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक असेल.
पाहा मजेदार व्हिडीओ
नवनीत सिकेरा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून हा मजेदार व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी कमेंटमध्ये युजर्सना विनोदी पद्धतीने विचारले की, “तुम्ही तुमच्या लहानपणी किती वेळा अशा प्रकारे घरी पोहोचलात आणि त्यानंतर कोणत्या शस्त्रानं तुमचं स्वागत झालं?” त्यांच्या या मजेशीर प्रश्नावर युजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील ‘या’ भाजीचा समावेश; तुम्हाला आवडते का ही भाजी?
एका युजरनं लिहिलं आहे, “मी एकदाही अशा स्थितीत पोहोचलो नाही. परंतु, इतर प्रकरणांमध्ये माझे विविध प्रकारच्या शस्त्रांनी स्वागत करण्यात आलं आहे.” तर आणखी एका युजरनंही अशाच पद्धतीनं लिहिलं आहे, “आईच्या चपलेनं अनेकदा भूत उतरवलं गेलं; पण आम्हीही कुठे ऐकणारे होतो. त्याच वेळी एका युजरनं लिहिलं आहे, “सर, नदीत अंघोळ करण्यासाठी गेलो म्हणून आणि चिखलात माखल्याबद्दल मला अनेकदा मारलं गेलं आहे.” तर चौथ्या युजरनं लिहिलं, “त्याचं अनेकदा झाडूनं स्वागत झालं आहे.”