Iran Hijab Protest Viral Video: महसा अमिनीच्या मृत्यूच्या निशेषधार्थ इराणमध्ये रण पेटले आहे. अनेक महिलांनी आजवर केस कापून, हिजाब जाळून कठीण संस्कृतीरक्षक पोलिसांच्या विरुद्ध बंड पुकारले आहे. याच आंदोलनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दोन तरुणी Bella Ciao या लोकप्रिय इटालियन गाण्याची पर्शियन आवृत्ती गात आहेत. इराणी बहिणी समीन आणि बेहीन बोलौरी यांनी गायलेले हे गाणे इराणमधील वास्तव मांडणारे असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
१६ सप्टेंबर रोजी समीन आणि बेहीन बोलौरी यांनी इंस्टाग्रामवर हे बेला चाओ कव्हर शेअर केले होते, याच दिवशी महसा अमिनी हिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. बोलौरी बहिणींनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पत्रकार हबीब खान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर देखील पोस्ट केला असून याला पाच लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून इराणी महिलांच्या अन्यायाच्या विरुद्ध लढ्याला समर्थन दिले आहे. अनेकांनी तर मला फारसी भाषा येत नाही पण या गाण्याची भावना मी समजू शकतो असे म्हणत बोलौरी बहिणींना पाठिंबा दर्शवला आहे .
पाहा इराणमधील निषेधाचा व्हायरल व्हिडीओ
इराणी तरुणी महसा अमिनी बाबत नेमकं काय घडलं?
जगभरातील प्रसारमाध्यमातुन समोर आलेल्या माहितीनुसार, महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला हिजाब नीट परिधान न करण्यावरून अटक केली होती. अटकेच्या पश्चात अचानक या तरुणीची प्रकृती खालावली व ती कोमात गेली. यानंतर तिला तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांच्या दरम्यान तिने आपला जीव गमावला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनीचा जीव घेतला असल्याचा आरोप करत इराणमधील महिला संतापाने पेटून उठल्या आहेत.