Milind Soman New Ad Controversy : बॉलीवूड अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पण, आता तो चर्चेत येण्यामागचे कारण एक जाहिरात आहे. अलीकडेच मिलिंदने शू ब्रँड ‘पुमा’ ची एक जाहिरात केली आहे. मिलिंद सोमणच्या या जाहिरातीवर भारतीय रेल्वे लेखा सेवा (IRAS) अधिकारी अनंत रुपनागुडी यांनी आक्षेप नोंदवला आहे. या जाहिरातीत मिलिंद सोमण एका रेल्वे ट्रॅकवर जॉगिंग करताना दिसतोय. ज्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. काहींनी या जाहिरातीबरोबर डिस्क्लेमर असले पाहिजे होते, अशी मागणी केली आहे.
जाहिरातीत मिलिंद सोमण धावतोय रुळावरून
अनंत रुपनागुडी यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर त्या जाहिरातीतील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘प्यूमा’ ब्रँड, मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आणि भारतीय रेल्वे मंत्री यांना ही पोस्ट टॅग करत त्यांनी लिहिले की, “माझा या जाहिरातीवर आक्षेप आहे. रेल्वे ट्रॅक हे जॉगिंगसाठी नाही, तर यात स्पष्टपणे त्यावर धावताना दिसत आहे. मिलिंद सोमण, ही जाहिरात शूट करण्यापूर्वी तुम्ही याची खातरजमा करायला हवी होती. कृपया या जाहिरातीवर डिस्क्लेमर टाका.”
जाहिरातीत नेमकं काय दाखवलं आहे?
जाहिरातीची सुरुवात घनदाट जंगलातील दृश्यांनी होते. यानंतर मिलिंद सोमण जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर जॉगिंग करताना दिसतोय. यानंतर तो जंगलातून धावत तेथील एका रेल्वे ट्रॅकवर पोहोचतो, तिथून शेवटी बोगदा पार करून तो धावत येताना दिसतोय. ४५ सेकंदांची ही जाहिरात तो जसा बोगदा पार करून बाहेर येतो तिथे संपते. या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारची मतं नोंदवली आहेत. ही जाहिरात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली असून ही अपघातांना प्रेरित करणारी असल्याचे मत काही लोकांनी मांडले आहे; तर काहींनी हे मार्केटिंग आणि प्रोडक्ट प्रमोशनचा भाग असल्याचे म्हणत जाहिरातीचे समर्थन केले आहे.
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
जाहिरात शूट करण्याची परवानगी कोणी दिली?
दरम्यान, अनेक युजर्स जाहिरातीच्या व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘प्रोजेक्ट साइन करताना अभिनेते-मॉडेल्स त्यांच्या मेंदूचा वापर करत नाहीत का? साधा कॉमनसेन्स नाही. ‘ दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘एक जबाबदार युनिट म्हणून, PUMA ने यावर एक डिस्क्लेमर जोडले पाहिजे होते. ‘ तिसऱ्या एका युजरने जाहिरातीला विरोध दर्शवत लिहिले की, ‘तो रस्त्याच्या मधोमधही जॉगिंग करताना दिसतोय, जो त्यासाठी बनवलेलाच नाही. याशिवाय जंगलातही. मला नाही वाटत, कोणताही व्यक्ती जंगलाच्या मुख्य क्षेत्रात असंच किंवा जॉगिंगसाठीदेखील जाऊ शकतो.’ दरम्यान, काहींनी भारतीय रेल्वे ट्रॅकवर चित्रीकरणाला परवानगी दिली कोणी, हा प्रश्न उपस्थित केला आहे.