Indian Railways Mission Raftaar : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, मात्र अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही, अशावेळी प्रवासी जनरल डब्ब्यातून काही वेळा उभं राहून तर कधी मिळेत त्या ठिकाणी बसून त्रासदायत प्रवास करतात. अनेक महिन्यापूर्वीपासून प्रयत्न करुनही कन्फर्म तिकीट मिळणे अवघड असते. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, पण अशाप्रकारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कारण भारतीय रेल्वेने प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी तयारी केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका मुलाखतीत, पुढील पाच वर्षांत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी रेल्वे जलद मार्गाच्या तयारीत व्यस्त आहे. ट्रेनचा वेग आणि गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे ‘मिशन रफ्तार’वर काम करत आहे. ज्यामध्ये रेल्वे मार्गावरील ४०० हून अधिक अडथळे दूर करण्यात येणार आहे.
हायस्पीड ट्रेनचा वापर
रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार सेमी हायस्पीड ट्रेनला प्रोत्साहन देत आहे. यासाठी रेल्वे नेटवर्कवरील ट्रॅफिक आणि बिजी रुटवरील ४०० हून अधिक अडथळे लक्षात घेऊन ते दूर केले जात आहेत. याचबरोबर रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे रोड ओव्हरब्रिज (ROB) आणि रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधले जात आहेत.
वंदे स्लीपरबाबत काय अपडेट आहे?
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याचे कामही सातत्याने करत आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून गाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. याचबरोबर वंदे भारत गाड्यांचाही सातत्याने विस्तार केला जात आहे. १८० किलोमीटर प्रतितास या वेगाने त्याचा वापर करण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्याच वेळी वंदे भारत स्लीपरचे वर्जन देखील जुलैमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, पुढील पाच वर्षांत पंतप्रधान मोदींची हमी आहे की, रेल्वेची क्षमता इतकी वाढवली जाईल की प्रवास करणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रवाशाला सहज कन्फर्म तिकीट मिळू शकेल.
वैष्णव म्हणाले की, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी रेल्वेमध्ये अभूतपूर्व बदल केले आहेत. गेल्या दशकात भारतीय रेल्वे कशी बदलली आहे याचे उदाहरण देत ते म्हणाले की, २००४ ते २०१४ दरम्यान सुमारे १७,००० किलोमीटरचे ट्रॅक बांधण्यात आले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४ ते २०२४ या काळात ३१,००० किलोमीटरचे नवीन ट्रॅक बांधण्यात आले. २००४ ते २०१४ या १० वर्षात केवळ ५००० किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण झाले, तर गेल्या १० वर्षांत तब्बल ४४,००० मीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण झाले.