IRCTC India Railway : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला फक्त ४५ पैशांमध्ये १० लाख रुपयांचे कव्हरेज मिळणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(IRCTC) ने त्यांच्या नवीन विमा पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये विमा प्रीमियम ४५ पैसे प्रति प्रवासी ठेवण्यात आला आहे. ही विमा पॉलिसी ऐच्छिक आहे, परंतु एकदा निवडल्यानंतर ती एकाच PNR अंतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य होईल. ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे आणि केवळ ई- तिकीटद्वारे बुकिंग करणारे प्रवासीच याचा लाभ घेऊ शकतात.
कोण करू शकतात अर्ज?
आयआरसीटीसीद्वारे ई-तिकीट बुक करणाऱ्या भारतीय नागरिकांनाच फक्त या विम्याचा लाभ घेता येईल. परदेशी नागरिक, एजंट किंवा इतर ट्रॅव्हल एजन्सींमार्फत तिकीट बुक करणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच पाच वर्षांखालील मुले, जे सीटशिवाय बुक करतात; त्यांचा या विम्यामध्ये समावेश केला जाणार नाही. परंतु, ५-११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी जर तिकीट सीटसह किंवा त्याशिवाय बुक केले असेल तर हा विमा मिळू शकेल.
विमा रक्कम आणि फायदे
विमा पॉलिसी अंतर्गत, विम्याचे पैसे चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.
१) मृतदेह स्थलांतर :
रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतदेह स्थलांतरित करण्यासाठी १०,००० पर्यंतचा विमा लाभ मिळेल.
२) दुखापतीसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च :
रेल्वे अपघातात जखमी झाल्यास दोन लाख रुपये मिळतील.
३) कायमस्वरुपी/ आंशिक अंपगत्व :
रेल्वे अपघातात कायमस्वरुपी आंशिक अंपगत्व आल्यास विम्याची १०० टक्के रक्कम १० लाख रुपये मिळतील.
४) मृत्यू
प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारशाला विम्याच्या रकमेच्या १०० टक्के म्हणजे १० लाखांपर्यंत रक्कम मिळेल.
कसा मिळवायचा विमा?
प्रवाशांना एसएमएस आणि ईमेलद्वारे विम्याची माहिती दिली जाईल, प्रवासी त्यांच्या तिकीट बुकिंग हिस्ट्रीतून पॉलिसी क्रमांक आणि इतर माहिती तपासू शकतात; विमा कंपनीच्या वेबसाइटवर तिकीट बुक केल्यानंतर नॉमिनीचा तपशील भरावा. जर नामनिर्देशन माहिती भरली नाही तर दाव्याच्या बाबतीत कायदेशीर वारसांना पैसे दिले जातील. ही विमा पॉलिसी फक्त कन्फर्म आणि आरएसी तिकीट धारकांसाठीच लागू असेल. प्रवासादरम्यान अपघात किंवा अनपेक्षित घटना घडल्यास प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे.
प्रवाशांना रेल्वे प्रवास विमा पॉलिसी कशी मिळेल?
रेल्वे प्रवास विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे तिकीट ऑनलाइन बुक करताना विमा पॉलिसीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर विमा कंपनीकडून प्रवाशाचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीवर मेसेज पाठवला जातो. या मेसेजमध्ये प्रवास, विमा कंपनीचे नाव आणि विमा सर्टिफिकेट नंबरचा समावेश आहे.
यासह एक लिंकही देण्यात आली आहे, ज्याद्वारे प्रवासी आपल्या नॉमिनीचे नाव अपडेट करू शकतात. विमा कंपनीकडून ईमेलमध्ये एक हेल्पलाइन क्रमांकदेखील दिला जातो, ज्यावर प्रवासी विम्याशी संबंधित सर्व प्रश्न विचारू शकतात.