भारतातील अनेक रस्त्यांवरील ट्रॅफिक जाममुळे नागरिक हैराण झाले आहेत. रोजच्या या ट्रॅफिक जाममुळे रस्त्यावर स्वत:ची गाडी असूनही ती बाहेर काढावी की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. ट्रॅफिक जाममुळे नागरिक तर हैराण झालेच आहेत; पण याचा फटका आता रेल्वेलाही बसला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात ट्रॅफिक जाममध्ये एक ट्रेन अडकून पडल्याचे दिसत आहे. होय! तुम्हाला ही मस्करी वाटेल; पण खरोखरच असे घडले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक ट्रेन मधेच थांबली आहे आणि अनेक वाहने तिच्यासमोरून जात आहेत. लोको पायलट सतत हॉर्न वाजवत थांबण्यास सांगत आहे; गाडीचालक थांबण्याऐवजी वाहने रूळ ओलांडून नेतच आहेत. यावेळी ट्रॅफिक इतके वाढले की, वाहतूक पोलिसांना जाम दूर करण्यासाठी तिथे यावे लागते. वाहतूक पोलिसांकडून हा ‘जाम’ सुरळीत करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पण, त्यांचे ऐकण्याऐवजी लोक वाहने पुढे नेण्यातच मश्गूल असल्याचे दिसतात.
लोको पायलटही वारंवार ट्रेनचा हॉर्न वाजवतो; पण कोणी ऐकत नाही. ट्रॅफिकच्या ‘वाहत्या गंगेत’ प्रत्येक जण आपले वाहन फाटक ओलांडून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. या ट्रॅफिकमुळे रेल्वे पूर्णपणे रखडली. हा व्हिडीओ बनारसमधील असल्याचे सांगितले जात आहे; जो तिथल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने कारच्या आतून बनवला होता.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ट्रेन उभी आहे. ट्रेनला जागा देण्यासाठी लोको पायलट सतत हॉर्न वाजवत असतो.. हे दृश्य अनेकांसाठी धक्कादायक आहे. कारण- एखादी ट्रेन अशा प्रकारे रेल्वे रुळांवरून वाहने हटवण्याची वाट पाहत बसल्याचे क्वचितच घडते.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @sarcasticschool_ नावाच्या युजरने पोस्ट केला होता. त्यानंतर तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार लाख ३१ हजार लाइक्स मिळाले आहेत; ज्यावर एका युजरने कमेंट्स करीत लिहिलेय की, आणि यांना बुलेट ट्रेन हवी आहे. दुसऱ्या एका युजरने लिहियले की, अमेरिकेत गाड्या ट्रेन सुटायची वाट बघतात आणि भारतात ट्रेन गाड्या जाण्याची वाट बघते. त्यावर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, भारतात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तर आणखी एकाने लिहिलेय की, हे फक्त भारतातच शक्य आहे. पण, या व्हिडीओवर तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट्स करून सांगा.