भारतीय रेल्वे मध्ये यापुढे तुम्हाला ५ वर्षांखालील लहान मुलांसोबत प्रवास करताना पूर्ण तिकीट काढावे लागणार असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता पीआयबी तर्फे स्पष्टीकरण देण्यात आले असून व्हायरल होणारी पोस्ट ही पूर्णतः खोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने आपल्या नियमात कोणताही बदल केलेला नाही. ५ वर्षाखालील मुलांसाठी जर का वेगळे बर्थ बुक केलेले नसेल तर पूर्ण तिकीट काढण्याची सक्ती नाही असेही उत्तर रेल्वे तर्फे देण्यात आले आहे.
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे, त्यांना तिकीट खरेदी करण्याचा आणि त्यांच्या ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी बर्थ बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आणि जर त्यांना वेगळा बर्थ नको असेल, तर तो पूर्वीप्रमाणेच विनामूल्य आहे.
व्हायरल पोस्टचे फॅक्ट चेक
भारतीय रेल्वेच्या ६ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार, पाच वर्षांखालील मुले त्यांच्या पालक/पालकांसह विनामूल्य प्रवास करू शकतात परंतु त्यांना स्वतंत्र सीट/बर्थ देण्यात येणार नाही. जर ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ/सीट हवी असल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल. अलीकडे काही व्हायरल झालेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्रवाशांना आता 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पूर्ण रक्कम भरावी लागेल हा दावा पीआयबी इंडियाने दिशाभूल करणारा असल्याचे सांगत खोदून काढला आहे.
दरम्यान, २०२२ मे महिन्यापासून भारतीय रेल्वेने लखनऊ मेल ट्रेनमध्ये खालच्या बर्थसह जोडलेले “बेबी बर्थ” सुरू केले. हे बर्थ वापरात नसताना दुमडले आणि स्टॉपरने सुरक्षित केले जाऊ शकतात. हे बेबी बर्थ ७७० मिमी लांब, २५५ मिमी रुंद आणि ७६.२ मिमी उंच आहेत. लखनौ मेल ट्रेनच्या डब्यांच्या दोन्ही टोकांवर दुसऱ्या केबिनच्या सीट क्रमांक १२ आणि ६० मुख्य बर्थ बसवण्यात आले होते. भारतीय रेल्वेने घेतलेली ही चाचणी होती आणि त्याचा निकाल अद्याप समोर आलेला नाही.