Vande Bharat Passengers To Now Get 500 ML Water Bottles : तुम्ही जर वंदे भारत, राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमिमय ट्रेनमधून प्रवास करीत असाल, तर तुम्हाला माहीतच असेल की, या ट्रेनमध्ये रेल्वेकडून प्रवाशांना मोफत पाण्याची बाटली दिली जाते. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या प्रवाशांना एक मोठा बदल अनुभवता येणार आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करताना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी रेल्वेने आता प्रवाशांना एक लिटर पाण्याच्या बाटलीऐवजी केवळ ५०० मिली पाण्याची बाटली देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, प्रवासी त्यांच्या गरजेनुसार आणखी ५०० मिलीची बाटली मोफत मागू शकतो.
आयआरसीटीसीने (IRCTC) सांगितले की, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. वंदे भारत ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला प्रत्येकी ५०० मिलीची एक रेल नीर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (PDW) बाटली दिली जाईल. पण, प्रवाशांच्या मागणीनुसार पुन्हा ५०० मिलीची बाटली कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिली जाईल.
रेल्वेचे म्हणणे आहे की, प्रवासी ट्रेनमधून प्रवास करताना एक लिटर पाण्याची बाटली घेतात; परंतु संपूर्ण प्रवासात त्या बाटलीतले सर्व पाणी संपवत नाहीत. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मात्र, पाण्याचा हा अपव्यय थांबविण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना आधी ५०० मिलीची रेल नीर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची (PDW) एक बाटली दिली जाईल.