Elon Musk Giorgia Meloni Viral Pic: टेस्ला या जगविख्यात कंपनीचे सीईओ एलॉन मस्क हे त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह एलॉन मस्क जेवण करतानाचा एक फोटो व्हायरल झाला. त्यानंतर मस्क यांच्या फॅन क्लबने एक पोस्ट केली, ज्यामुळे गजहब उडाला. टेस्ला ओनर्स सिलिकॉन व्हॅली या एक्स अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला. “तुम्हाला वाटतं की हे दोघं एकमेकांना डेट करत असतील?”, असा प्रश्न फोटोसह कॅप्शनमध्ये विचारण्यात आला. यानंतर स्वतः एलॉन मस्कला या पोस्टखाली रिप्लाय देऊन खरं काय ते सांगावे लागले.

पोस्ट काय होती?

या पोस्ट खाली एलॉन मस्क यांनी कमेंट करून सांगितले की, आम्ही एकमेकांना डेट करत नाही. त्यानंतर आणखी काही युजर्सनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यावर मस्क यांनी पुन्हा एक पोस्ट टाकून या फोटोतील भेटीचे स्पष्टीकरण दिले. “मी तिथे माझ्या आईसह गेलो होतो. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी माझे प्रेमसंबंध नाहीत”, असे मस्क यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा >> मस्क यांचा नवीन निर्णय; ‘एक्स’वर एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही दिसणार पोस्ट, काय आहेत धोके?

Elon musk comment
एलॉन मस्क यांनी काय म्हटले?

२४ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान मस्क आणि मेलोनी यांची भेट झाली होती. यावेळी मस्क यांनी मेलोनी यांचे तोंडभरून कौतुक केले, त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी असल्याची अफवा उठली. ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, मस्क यांच्या हस्ते मेलोनी यांना ‘अटलांटिक कौन्सिल ग्लोबल सिटिझन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मस्क यांनी हा पुरस्कार प्रदान करताना अतिशय आनंद होत असल्याचे म्हटले. “जी व्यक्ती बाह्यरुपाने सुंदर आहे, त्यापेक्षा आतून कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे, अशा व्यक्तीला पुरस्कार देण्याचा मान मला मिळाला”, असे विधान मस्क यांनी पुरस्कार देताना केले.

मी आईसह त्या पुरस्कार सोहळ्यासाठी गेलो होतो, असेही मस्कय यांनी म्हटले.

मस्क पुढे म्हणाले, “ती अस्सल, प्रामाणिक आणि सत्यवचनी आहे. सर्वच राजकारण्यांबाबत असे म्हणता येत नाही.” जॉर्जिया मेलोनी यांनीही मस्क यांच्या या छोट्याश्या भाषणाचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच एलॉन यांचे आभार मानले आहेत.

जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने आणि नेतृत्वाने जगभरात ठसा उमटविला आहे. तसेच युरोपियन संघाला त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे, ब्लुमबर्गने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Story img Loader