२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरु झाली होती. धोनीने अधिकृतपणे आपल्या निवृत्तीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती. मात्र विराट कोहलीने गुरुवारी केलेल्या एका ट्विटमुळे नेटीझन्समध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.

२०१६ साली भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात भारताला १६१ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ९४ धावांत माघारी परतले होते. यानंतर धोनीने विराट कोहलीच्या साथीने खेळपट्टीवर तग धरत भारताची एक बाजू भक्कम धरुन ठेवली होती. विराटने या सामन्यात नाबाद ८२ तर धोनीने नाबाद १८ धावा केल्या होत्या. या सामन्यात एका धावेसाठी धोनीने विराटला अक्षरशः पळवलं होतं. या सामन्यात विराट एवढा थकला की सामन्यानंतर त्याने धोनीसमोर गुडघे टेकले.

याच आठवणीचा एक फोटो विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

त्याच्या या ट्विटवरुन नेटीझन्समध्ये धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा रंगायला सुरुवात झाली.

भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी धोनी आपली निवृत्ती घोषित करणार होता. मात्र कर्णधार विराट कोहलीने केलेल्या विनंतीमुळे त्याने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला होता.

Story img Loader