७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्राइल-हमास युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. इस्रायली सैन्य लवकरच गाझा शहरावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने इस्रायल आणि गाझामधील आपल्या लोकप्रिय अॅपवरून लाईव्ह ट्रॅफिक कंडिशन फीचर बंद केल्याची बातमी आहे. परिणामी, इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेल्या गुगलच्या मॅप आणि Waze अॅप्समध्ये लाईव्ह ट्रॅफिक कंडिशनची स्थिती पाहण्याची सुविधा आता राहणार नाही. गुगलच नव्हे तर अॅपलसारख्या मोठ्या कंपनीनेही हा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या टेक कंपन्यांनी हा निर्णय इस्रायली लष्कराच्या सांगण्यावरून घेतला आहे. असा फीचर बंद करण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतलेला नसून यापूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्येही अशीच बंदी घालण्यात आली होती.
(हे ही वाचा : नॉर्वेच्या राजदूतांना पडली साडीची भुरळ; दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गेल्या अन् म्हणाल्या…; पाहा पोस्ट )
खरं तर, इस्रायली सैन्याच्या विनंतीवरून Google आपल्या डेटामधून रिअल टीन क्राउडिंग डेटा काढून टाकत आहे. असे सांगण्यात येत आहे की, इस्रायली लष्कराला वाटते की, लाईव्ह ट्रॅफिक कंडिशन फीचरच्या मदतीने त्यांच्या सैन्याच्या हालचालीची माहिती उघड होऊ शकते. हमासपर्यंत थेट किंवा अप्रत्यक्षपणे पोहोचणारी ही माहिती इस्रायली लष्करासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Google ने सांगितले की Maps आणि Waze सारखे अॅप्स यापुढे रिअल-टाइम ट्रॅफिक दाखवणार नाहीत, परंतु जे ड्रायव्हर्स त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी Google नकाशे वापरतात त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याच्या अंदाजे वेळेबद्दल माहिती मिळत राहील, असे कंपनीने स्पष्ट केलं आहे.