Israel Hamas War Videos: इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने गंभीर स्वरूप धारण केलं आहे. इस्रायलमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ला सुरू केला. २० मिनिटांत तब्बल पाच हजार रॉकेट गाझा पट्टीतून इस्त्रायलच्या प्रदेशात डागण्यात आले. कालपर्यंत (शनिवार) ३०० जणांचा मृत्यू झाला होता. तर, आता हाच आकडा ४८० वर पोहोचला आहे. दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ रेकॉर्ड झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अवघ्या जगाचा श्वास रोखला…
यावेळी एक घटना अशी घडली की, अवघ्या जगाचा श्वास रोखला. हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला. या हल्ल्यामध्ये गाझातील अनेक निवासी भागही या युद्धाचे बळी ठरले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात काही ठिकाणी संपूर्ण उंच इमारती जमीनदोस्त झाल्या, तर काही ठिकाणी युद्धाचे थेट कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि जमिनीवर पडली आहे. आजूबाजूच्या सर्व इमारती पाहिल्यास किती नुकसान झाले असेल याची कल्पना येऊ शकते. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या मिळालेली नाही. ती पत्रकारही पूर्णपणे घाबरलेली दिसत आहे, कारण इकडे घडणारी प्रत्येक गोष्ट आता त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे.
पाहा व्हिडीओ
इस्रायलचे पंतप्रधान काय म्हणाले?
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, आमचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. या दरम्यान आम्ही इस्रायलच्या नागरिकांच्या सुरक्षेचाही विचार करत आहोत, तसेच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये शत्रूंना वीज, इंधन आणि इतर वस्तूंचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.