बीजगणित, वर्गमुळे, वेळेचा सिद्धांत, स्थापत्यशास्त्र, धातूशास्त्र, अवकाश विज्ञानाचे सिद्धांत वेदांमधून घेतले असल्याचा मोठा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी केला आहे. वेदांमधील हे सिद्धांत अरब देशांतून युरोपीय देशांत गेले. तेथील संशोधकांनी हे शोध आपल्या नावावर करून घेतले, असंही ते म्हणाले.
इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ उज्जैन येथे महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वेदांबाबत हा मोठा दावा केला आहे. एस. सोमनाथ म्हणाले की, “शास्त्रज्ञांकडून संस्कृत भाषेचा वापर केला जात असे. संस्कृत भाषा लिखित नव्हती. परंतु, लोक एकमेकांचं ऐकून शिकत होते. त्यामुळे ही भाषा आजपर्यंत टिकली आहे.”
“संगणकाची भाषा देखील संस्कृत आहे. ज्यांना संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शिकायची आहे त्यांच्यासाठी संस्कृत भाषा खूप फायदेशीर ठरू शकते. संस्कृत भाषेत लिहिलेले भारतीय साहित्य तात्विकदृष्ट्या खूप समृद्ध आहे. संस्कृतमधील संस्कृती, धर्म आणि विज्ञान यांच्या अभ्यासात फारसा फरक नाही, असं सोमनाथ म्हणाले.
“अंतराळ विज्ञान, चिकिस्ता, भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान इत्यादी संस्कृत भाषेत लिहिले गेले होते. परंतु आजपर्यंत त्यावर फारसे संशोधन झालेले नाही. अंतराळ विज्ञानावर आधारित सूर्य सिद्धांत हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक आठव्या शतकातील असल्याचे मानले जाते. या पुस्तकात सौर ऊर्जा आणि टाइम स्केलचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, हे जाणून मला खूप आश्चर्य वाटले”, असंही सोमनाथ म्हणाले. दीक्षांत समारंभानंतर एस. सोमनाथ यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन पूजा व दर्शन घेतले.