चांद्रयान-२ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे मोहिमेला झटका बसला आहे. पण दुसऱ्या बाजूला एक चांगली बातमी सुद्धा आहे. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरचे आयुष्य आणखी सहा वर्षांनी वाढवण्यात आले आहे. ऑर्बिटरचे आयुष्य आधी एक वर्ष असणार होते. पण आता ऑर्बिटर सात वर्ष काम करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्राभोवती फिरुन ऑर्बिटर चंद्राचा पृष्ठभाग आणि तेथील वातावरणासंबंधी महत्वपूर्ण माहिती गोळा करणार आहे. चांद्रयान-२ मधील इंधन वाचवल्यामुळे ऑर्बिटरचे आयुष्य वाढवणे इस्रोच्या वैज्ञानिकांना शक्य झाले आहे. २२ जुलैला जेव्हा श्रीहरीकोट्टा येथून चांद्रयान-२ अवकाशात झेपावले तेव्हा ऑर्बिटरमध्ये १६९७ किलो इंधन होते. आता फक्त ५०० किलो इंधन उरले आहे. या मोहिमेत रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर संशोधन करण्याचे इस्रोचे लक्ष्य होते. पण लँडर बरोबर संपर्क तुटल्यामुळे हे अजून शक्य झालेले नाही. प्रग्यान रोव्हर लँडरच्या आतमध्ये आहे.

नियंत्रण कक्षातून इस्रोचे वैज्ञानिक अजूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता फक्त हातात १० दिवस उरले आहेत. २२ जुलैला जीएसएसव्ही मार्क ३ म्हणजेच बाहुबली या भारताच्या शक्तीशाली रॉकेटने चांद्रयान-२ ला पृथ्वी जवळच्या कक्षेत स्थापित केले. त्यानंतर चांद्रयान-२ ने स्वत:चा प्रवास सुरु केला. चंद्रावर जाण्यासाठी पृथ्वीपासूनची कक्षा वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी चांद्रयान-२ ने आपल्याजवळ असलेल्या इंधनाचा वापर केला.

१४ ऑगस्टला चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले व सहा दिवसांनी २० ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. एक सप्टेंबरला ऑर्बिटरने शेवटचा कक्षाबदल केला व चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्रापर्यंतच्या प्रवासात कक्षाबदल करताना ऑर्बिटरने त्याच्यामधील इंधनाचा वापर केला. आता ऑर्बिटर चंद्रापासून १०० किलोमीटर अंतरावर असून त्याच्यामध्ये ५०० किलो इंधन अजून बाकी आहे. त्यामुळेच ऑर्बिटरचे आयुष्य सात वर्षापर्यंत वाढवता आले.

ऑर्बिटरवर उच्च क्षमतेचे कॅमेरे असून त्याच्या मदतीनेही चंद्रावर पाणी आणि बर्फ शोधून काढता येईल असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. कदाचित ऑर्बिटरचा पुन्हा कक्षाबदल करुन त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यात येऊ शकते.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro chandrayaan 2 mission orbiter life south pole dmp