ISRO Chief S.Somnath About NASA Offer: चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी सुरु असताना नासाच्या शास्त्रज्ञांचे एक शिष्टमंडळ, इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली होती. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून ते सुरुवातीला थक्क झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी इतके स्वस्त किमतीतील तंत्रज्ञान पाहून नासाच्या शास्त्रज्ञांनी इस्रोने हे तंत्रज्ञान अमेरिकेला विकावे असाही प्रस्ताव मांडला होता. याविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वरममध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ यांनी भेट दिली होती. सुरुवातीला नुकत्याच झालेल्या एका स्पेस कॉन्फरन्समध्ये आलेल्या अनुभवाचा संदर्भ देत सोमनाथ म्हणाले की, नासा आणि युरोप आणि चीनच्या अंतराळ संस्थांमधील प्रत्येकजण चांद्रयान -3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे. “त्यांना एवढं कौतुक वाटण्याची गरज काय? तर त्यांना जाणीव आहे की भारत एक शक्तिशाली राष्ट्र होणार आहे.”
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोमनाथ म्हणाले, “काळ बदलला आहे. आपण सर्वोत्कृष्ट उपकरणे आणि सर्वोत्तम रॉकेट तयार करण्यास सक्षम आहोत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश संशोधन क्षेत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आपल्या ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची पातळी जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. भारत भविष्यात अत्यंत शक्तिशाली राष्ट्र असेल. आपण तंत्रज्ञानातही सर्वात पुढे असू.”
NASA चा इस्रोकडे प्रस्ताव
चांद्रयान-३ पूर्वी नासाच्या टीमने इस्रोला भेट दिल्याचा किस्सा सांगताना सोमनाथ म्हणाले की, “नासाच्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेतील 5-6 लोक (इस्रोच्या मुख्यालयात) आले होते. आम्ही चांद्रयान-३ तंत्रज्ञानाबद्दल त्यांना समजावून सांगितले. ज्यावर नासाच्या शिष्टमंडळाने म्हटले की, ‘तुमचं कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. सर्व काही परफेक्ट होणार आहे. इतक्या कमी किमतीत तुम्ही एवढी उच्च क्षमतेची उपकरणे कशी बनवली? तुम्ही हे तंत्रज्ञान अमेरिकेला का विकत नाही?”
कलाम यांच्या इस्रोमधील कार्यकाळाची आठवण करून देताना सोमनाथ म्हणाले, “मी 1985 मध्ये इस्रोमध्ये सामील झालो आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य लाभले, पण अगदी कमी कालावधीसाठी कारण तेव्हा ते DRDO मध्ये काम करण्यासाठी इस्रोमधून बाहेर पडणार होते. जेव्हा जीएसएलव्ही प्रक्षेपण अयशस्वी झाले तेव्हा कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. स्वत: रॉकेट इंजिनिअर असल्याने त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. पण नंतर ते म्हणाले, “प्रयत्न करत राहा आणि तुम्ही यशस्वी व्हाल, आणि आम्ही तेच केलं.”