इस्रोच्या वैज्ञानिकांनी विक्रम लँडरशी संपर्काची आशा सोडलेली नाही. चंद्रावर हार्डलँडिंग करणाऱ्या विक्रम लँडरबरोबर दिवस सुरु झाल्यानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी तसे संकेत दिले. बंगळुरुस्थित इस्रोच्या मुख्यालयातून विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण दहा दिवसांपूर्वी चंद्रावर रात्र सुरु झाल्यानंतर हे प्रयत्न थांबवण्यात आले.

सात सप्टेंबरला अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. आता रात्र असल्यामुळे विक्रमशी संपर्क करणे शक्य नाही. दिवस सुरु झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न करु शकतो. लँडिग साईटच्या जागी आता रात्र आहे. तिथे सूर्यप्रकाश नाही असे इस्रोचे चेअरमन के.सिवन यांनी सांगितले. विक्रम लँडर आणि त्यातल्या प्रग्यान रोव्हरची रचना एक दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो.

लँडरशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता खूप धुसर आहे. कारण चंद्रावर रात्रीच्या थंड वातावरणात ही उपकरणे तग धरण्याची शक्यता कमी आहे. इतक्या दिवसांनी संपर्क होणे कठीण आहे पण प्रयत्न करण्यात काही चुकीचे नाही असे इस्रोच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठरवलेल्या वेगापेक्षा जास्तवेगात लँडर चंद्रावर उतरला होता. त्यामुळे आतमधल्या उपकरणांचे नुकसान झालेले असण्याची शक्यता आहे.

संपर्क साधण्याचा अँटिना कुठल्या दिशेला आहे ते ही ठाऊक नाही अशा परिस्थितीत संपर्काची शक्यता खूप कमी आहे. नासाच्या ऑर्बिटरलाही विक्रम लँडरचे फोटो मिळवता आले नव्हते. ज्या वेळी ऑर्बिटर तिथून गेला तेव्हा संधी प्रकाश होता. त्यामुळे सावल्यांखाली लँडर झाकला गेल्याची शक्यता आहे. आता १४ ऑक्टोंबरला नासाचा ऑर्बिटर तिथून पुन्हा जाणार आहे. त्यावेळी लख्ख प्रकाश असल्यामुळे विक्रमचे फोटो मिळण्याची दाट शक्यता आहे.

चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली हे माझे शब्द नव्हते,
चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली हे माझे शब्द नव्हते. समितीने सुरुवातीला विश्लेषण करुन मोहिमेच्या यशाचे मूल्यमापन केले होते. त्या आधारावर हा आकडा देण्यात आला होता. या मोहिमेत जे महत्वाचे टप्पे गाठले त्या आधारावर ९८ टक्के यश मिळवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.

Story img Loader