Georgia Meloni Mobile Cover Text: दुबईतील COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा सेल्फी इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुरुवातीला मेलोनी यांच्या फोटोपेक्षा त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनमधील हॅशटॅगची प्रचंड चर्चा झाली होती. पण आता काही दिवसांनी नेटकऱ्यांना मेलोनी यांच्या फोनच्या कव्हरमध्ये असं काही दिसलंय की त्यावरून चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे. मेलोनी यांच्या फोनचे कव्हर सर्वांचे लक्ष वेधून घेत असताना इटलीच्या पंतप्रधान कार्यालयातून हे कव्हर मेलोनी यांच्या ७ वर्षाच्या लेकीने त्यांना भेट दिले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे पण यावरील मजकूर नेमका काय आहे हे आज आपण पाहणार आहोत.
व्हायरल फोटोंमध्ये दिसत असल्याप्रमाणे मेलोनी यांच्या फोन कव्हरवर चिंताग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी काही संदेश होते. जेव्हा पंतप्रधान मोदींसह मेलोनी सेल्फी घेत होत्या तेव्हा तो क्षण एका फोटोमध्ये कैद झाला होता आणि मग या व्हायरल फोटो कव्हरची चर्चा सुरु होती. यामध्ये ठळक अक्षरात ‘चिंताग्रस्त स्थितीसाठी सकारात्मक विचार’ असे हेडिंग दिसत होते तर छोट्या डूडलसह अनेक एक दोन शब्दांचे संदेश सुद्धा यावर आजूबाजूला दिसत होते.
कव्हरमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि चिंताग्रस्त लोकांचा तणाव कमी करण्यासाठी विधाने दिली आहेत. उदाहरणार्थ “उद्या एक नवीन दिवस आहे,”माझी चिंता, मी कोण आहे ठरवत नाही”, “माझ्या मानसिक आरोग्यासाठी नाही म्हणणे चांगले आहे”, “मी स्वत: ला विश्रांती घेण्याची परवानगी देतो,” इत्यादी.
मोबाईल फोन कव्हरविषयी सोशल मीडियावर चर्चा होताच, इटालियन पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने सांगितले की ते मेलोनी यांना त्यांची ७ वर्षांची मुलगी जिनर्व्हा हिने हे कव्हर भेट दिले होते.
मेलोनी यांचं चर्चेतील मोबाईल कव्हर
दरम्यान, इटलीचा लोकप्रिय पक्ष फ्रॅटेली डी’इटालियाच्या नेत्या मेलोनी यांनी COP28 शिखर परिषदेला उपस्थित असताना #Melodi या हॅशटॅगसह PM मोदींबरोबरचा एक सेल्फी शेअर केला. #Melodi, म्हणजेच मोदी आणि मेलोनीच्या आडनावांना एकत्र करून केलेला हॅशटॅग आहे. X वरील ट्रेंड्सच्या यादीत काहीच सेकंदात हा हॅशटॅग अव्वल स्थानी होता.
#Melodi
या फोटोने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला हे वेगळे सांगायला नको. शुक्रवारी शेअर केल्यापासून, इटालियन पंतप्रधानांच्या पोस्टला तब्बल ४४.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर पीएम मोदींनी सुद्धा मेलोनी यांची पोस्ट रिट्विट करून “मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.” असं लिहिलं होतं.