Italy PM Georgia Meloni Separation: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी त्यांच्या बॉयफ्रेंडपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली. जॉर्जिया यांचा जोडीदार पत्रकार अँड्रिया जिआमब्रुनो याने प्रसारमाध्यमांवर अश्लील शेरेबाजी केली होती. यानंतर जॉर्जिया यांनी तब्बल १० वर्षाचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जॉर्जिया यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये आमचे नाते इथेच संपत आहे, आमचे मार्ग वेगळे होत आहेत असं लिहिलं आहे. शिवाय इटालियन भाषेत त्यांनी आपल्या व अँड्रियाच्या नात्याविषयी मत सुद्धा व्यक्त केलं आहे.

जिआमब्रुनो आणि मेलोनी यांचे लग्न झालेले नाही. मात्र मागील 10 वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे. जॉर्जिया यांनी आपली मुलगी जिनिव्हा हिचा पोस्टमध्येही उल्लेख करत म्हटले की, ” मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करू शकले नाही पण माझ्या मुलीचे तिच्या आई व वडिलांवर सुद्धा खूप प्रेम आहे. जिआमब्रुनोने मला जिनिव्हाच्या रूपात आयुष्यातील सर्वात मोलाची भेट दिली आहे आणि मी तिचे नेहमी रक्षण करेन. शिवाय जिआमब्रुनोसह असलेल्या नात्याचा व मैत्रीचा सुद्धा मी आदर करते.

जॉर्जिया यांनी पुढे पोस्ट मध्ये तळटीप लिहीत आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मेलोनी लिहितात की, “पाण्याच्या थेंबाने दगडाला संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, दगड हा दगड असतो आणि पाण्याचा थेंब फक्त थेंबच असतो. त्यामुळे माझं खच्चीकरण करू पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं”.

जॉर्जिया मेलोनी इन्स्टाग्राम पोस्ट

रॉयटर्सच्या माहितीनुसार , MFE मीडिया ग्रुपचा एक भाग असलेल्या Mediaset वर “Diario del Giorno” हा शो होस्ट करणारा जिआमब्रुनो अलीकडेच वादात अडकला होता. त्याच्या कार्यक्रमातील ऑफ-एअर क्लिप्समध्ये तो महिला सहकाऱ्यांसमोर असभ्य भाषेत बोलत अश्लील शेरेबाजी करत होता. यापूर्वी ऑगस्टमध्ये त्याच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेला दोष देणार्‍या कमेंट करण्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यावेळेस त्याने महिला नशेत नसतील तर बलात्कार टाळू शकतात असे म्हटले होते.