एकिकडे हिवाळ्यात उत्तरेकडील अनेक राज्यात पारा उणे एक किंवा २ अंश सेल्शिअसच्या आसपास पोहचला आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीत काश्मिरमधले तलाव गोठू लागले आहेत. पण जर जगात सध्या कुठे कडाक्याची थंडी पडली असले तर ती नक्कीच रशियाच्या सैबेरियात असेल. कडाक्याच्या थंडीने येथील तापमान चक्क उणे ४१ अंशावर पोहचले आहेत. अगदी उकळते पाणी सहज हवेत फेकले तरी त्याचा बर्फ होईल इतका पारा खाली उतरला आहे.
वाचा : तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सहारा वाळवंटात बर्फवृष्टी
आर्कटिक ब्लास्टनंतर सैबेरियातल्या अनेक भागात गोठवणा-या थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे या भागातील तापमान उणे ४१ अंश सेल्शिअसच्या खाली पोहचले आहे. काउंटी मानसी भागात तर हे तापमान उणे ६० अंश सेल्शिअसच्या खाली गेले आहे. गेल्या ८३ वर्षांतले हे सर्वात कमी तापमान आहे. १९३३ मध्ये येथील तापमान हे उणे ६५ अंश सेल्शिअसपेक्षा खाली गेले होते. याचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरुणाने येथे थंडीची तिव्रता किती अधिक आहे हे दाखवण्यासाठी व्हिडिओच्या रुपात प्रात्यक्षिक दाखवले आहे. या तरुणाने उकळते पाणी इमारतीच्या खिडकीतून खाली फेकले. पण हे पाणी हवेत फेकल्या फेकल्या पापणी लवते न लवते तोच त्याचे रुपांतर बर्फात झालेले पाहायला मिळाले. ChrisOnerVidz या युट्युब अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकण्यात आला. आतापर्यंत बारा लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.