मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस नेहमीच नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि नियंमाची आठवण करून देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात. अलीकडेच त्यांनी सुरक्षित रस्ते वाहतुकीसंदर्भात एक इन्स्टाग्राम पोस्ट केली. या पोस्टमध्ये पोलिसांनी बॉलीवूड स्टार शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या २०१७ मधील ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या कव्हर इमेजचा वापर करून महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या नावातून अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने चालकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात सल्ला दिला आहे. त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांनी पोस्टमधील फोटोत ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटातच्या नावावरून ‘जब हेल मेट सेफ्टी’ अशी क्रिएटिव्ह लाइन काढली. त्यातून बाईक चालविताना हेल्मेट घालणे किती महत्त्वाचे असते हे अधोरेखित केले. तुम्ही ज्याला शोधत आहात, ते तुम्हाला शोधतोय, असे चित्रपटाचे उपशीर्षक आहे, त्याचाही पोलिसांनी क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करीत, तुम्ही काय शोधत आहात, तुमची सुरक्षितता शोधत आहात का, असे लिहिले आहे.
त्यासह चित्रपटातील ‘सफर’ गाण्याचा वापर करीत कॅप्शनमधून बाईकस्वारांना अनोख्या पद्धतीने आवाहन केले आहे की, help ‘safar’ not ‘suffer’, with just a little precution. यातून पोलिसांनी चालकांना फक्त थोडी सावधगिरी बाळगून प्रवास करा आणि अपघात टाळा, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मुंबई पोलिसांची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक काही युजर्सनी, तर मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमचे कौतुक केले, “तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया टीम आहे.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, रस्त्यावरील खड्ड्यांकडेही लक्ष द्या. या खड्ड्यांमुळे पडून दुसऱ्या गाडीला धडक बसते, त्यामुळे हेल्मेटबरोबर रस्तेही चांगले असणे गरजेचे आहेत.
रस्ता आणि सार्वजनिक सुरक्षिततेबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी मुंबई आणि दिल्ली पोलीस त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर वारंवार क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करतात.