ब्रिटनच्या ताब्यात असलेल्या कोहिनूरपेक्षा भारतात दुप्पट मोठा हिरा आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयामध्ये हैद्राबादच्या निझामांच्या आभूषणे आणि मौल्यवान रत्नाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध ‘जेकब डायमंड’ या हिऱ्याचा देखील समावेश असून, हा हिरा कोहिनूरपेक्षा दुप्पट मोठा असल्याचे म्हटले जाते. १८५ कॅरेटच्या ‘जेकब डायमंड’ची किंमत ४०० कोटी रूपये आहे.
सोमवार १८ फेब्रुवारीपासून या प्रदर्शनाला सुरूवात झाली असून ५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. तब्बल बारा वर्षांच्या कालावधीनंतर आभूषणे व रत्ने प्रदर्शित करण्यात आली असून, यामध्ये १७३ मौल्यवान चीजवस्तूंचा समावेश आहे. यामध्ये अनेक आभूषणे व रत्नजडित वस्तूंचा समावेश आहे. यामधील काही आभूषणे सतराव्या ते अठराव्या शतकाच्या दरम्यान घडविली गेली असून, यांना ‘आदिलशाही आभूषणे’ म्हटले जाते. तसेच या संग्रहामध्ये समाविष्ट असलेले पाचूंचे बाजूबंद टिपू सुलतानाचे असल्याचे ही म्हटले जाते.
‘Jewels of India: The Nizam’s Jewellery Collection’, an exhibition displaying 173 jewels&jewellery from collection of Nizams of Hyderabad,is currently underway in Delhi. Jacob diamond,one of the largest in world,has also been exhibited. Exhibition will continue till May 5. (19.2) pic.twitter.com/9OoAhZgAij
— ANI (@ANI) February 20, 2019
१९९५ साली भारत सरकारने खरेदी केलेला निजामांच्या आभूषणांचा संग्रह सर्वात मोठा असून या संग्रहाची किंमत २१८ कोटी रुपये होती. तत्पूर्वी हैद्राबादचे शेवटचे निझाम मीर ओस्मान अली यांनी स्थापित केलेल्या निझाम ज्वेलरी ट्रस्ट व निझाम सप्लीमेंट ज्वेलरी ट्रस्ट यांच्या ताब्यामध्ये हा आभूषणांचा संग्रह होता. या पूर्वी निझाम यांच्या आभूषणांचे प्रदर्शन २००१ साली व त्यानंतर २००७ साली भरविण्यात आले असून आता बारा वर्षांच्या काळानंतर हे प्रदर्शन पुन्हा एकदा आयोजित करण्यात आले आहे.