Jai Jawan Govinda Pathak 10 thar practice video: गोकुळाष्टमी देशभर मोठ्या उत्साहात साजरी होते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत दहीहंडीची लगबग असते. मुंबईतील गोंविदा पथकांमध्ये अधिक उंच हंडी कोण लावणार? जास्तीत जास्त हंडी कोण फोडणार याची स्पर्धा रंगते. गोविंदा पथकांच्या या गर्दीत ‘जय जवान’ पथक हे जगप्रसिद्ध आहे. जागतिक विक्रमांच्या यादीत नाव नोंदविणारं हे पथक या वर्षीही मोठ्या उत्साहानं तयारीला लागलंय. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वांत मोठं पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय जवान गोविंदा पथकानं १० थर रचण्याचा केलेला प्रयत्न सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.
जोगेश्वरी पूर्वेच्या जय जवान गोविंदा पथकात ५०० हून जास्त गोविंदा आहेत. या मंडळाचा सराव दहीहंडीच्या दोन महिने आधीच सुरू होतो. यंदा २७ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या दहीहंडी उत्सव आहे. त्यामुळे या पथकाच्या तयारीनं वेग पकडलाय. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं लयबद्धरीत्या कमीत कमी वेळामध्ये थर लावण्याचं प्रात्यक्षिक जय जवान पथकानं जगासमोर ठेवलं आहे. सध्या त्यांनी त्यांच्या सरावादरम्यान १० थर लावण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे हे गोविंदा पथकाचं लक्ष्य असतं. त्याप्रमाणे या पथकातील सर्व गविंदांनी हे थर रचले खरे; पण शेवटी काही थर उभारताच मनोरा कोलमडून खाली पडतो. त्यामध्ये आठव्या थरावरील गोविंदाचा पाय घसरतो आणि अख्खा मनोरा खाली पडल्याचं दिसत आहे.
दरम्यान, यावेळी सगळ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतल्याचं दिसत आहे. यावेळी सर्वांत वर जो चिमुकला गोविंदा आहे, त्याला सुरक्षा जॅकेट, हेल्मेट तसेच दोरीनं बांधलं आहे. त्यामुळे जेव्हा थर कोसळले तेव्हा तो हवेत लटकताना दिसत आहे. ‘जय जवान’ या पथकाच्या गोविंदांनी सराईतपणे झाडावर चढणाऱ्या वानरांप्रमाणे झटपट नऊ थर लावले. इतर गोविंदा पथके सात ते आठ थरांची सलामी देत असताना ‘जय जवान’ मात्र नऊ थरांची सलामी देत आहेत. त्यामुळे यंदाही सर्वाधिक बक्षिसं ‘जय जवान’च पटकावणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असो, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा १० थरांच्या प्रयत्नात नेमकं काय चुकलं?
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
जय जवान या पथकाने १० थरांचा प्रयत्न केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर kokan_kinaraa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.