पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. यामध्ये राम मंदिरासंदर्भातील सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्यांबरोबरच बाबरीचे समर्थन करणाऱ्यांकडून काही हॅशटॅग ट्रेण्ड केले जात असल्याचे दिसत आहे. #पधारो_राम_अयोध्या_धाम हा हॅशटॅग टॉप ट्रेण्ड असून दुसऱ्या क्रमांकाला #JaiShreeRam हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. तर तिसऱ्या क्रमांकाला #BabriZindaHai हा हॅशटॅग आहे. एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरीसंदर्भातील ट्विटमध्ये #BabriZindaHai हा हॅशटॅग वापल्याने तो ट्रेण्ड होऊ लागला आहे.
काय ट्विट केलं होतं ओवेसींनी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला काही तास शिल्लक असतानाच ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असं म्हटलं आहे. “बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असं ट्विट ओवेसींनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे.
#BabriMasjid thi, hai aur rahegi inshallah #BabriZindaHai pic.twitter.com/RIhWyUjcYT
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 5, 2020
ओवेसी यांनी #BabriZindaHai हा हॅशटॅग वापरल्यानंतर तो टॉप ट्रेण्डमध्ये आला आहे. अनेकांनी बाबरीसंदर्भातील ट्विट केलं असून ओवेसींचे ट्विटही चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायाला मिळत आहे.
टॉप पाच ट्रेण्ड कोणते?
ट्विटरवर सुरु असणाऱ्या हॅशटॅग वॉरमध्ये वेगवेगळ्या प्रकराचे ट्रेण्ड दिसून येत असले तरी प्रामुख्याने राम मंदिराच्या बाजूने बोलणारे आणि बाबरीच्या बाजूने बोलणारे असे दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत टॉप ट्रेण्ड असणाऱ्या #पधारो_राम_अयोध्या_धाम हा हॅशटॅग वापरुन एक लाख ३३ हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #JaiShreeRam हॅशटॅगवर ८३ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. ट्रेण्डींग हॅशटॅगमध्ये तिसऱ्या स्थानी असणाऱ्या #BabriZindaHai हा हॅशटॅगचा वापर करुन ३१ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावरील #RamMandir हॅशटॅगवर १ लाख ७२ हजार तर पाचव्या क्रमांकावरील #LandOfRavanan हा हॅशटॅगचा वापर करुन १३ हजारहून अधिक ट्विट केले आहेत.
दरम्यान ट्विटरबरोबरच फेसबुक आणि व्हॉटस्अपवरही कालपासूनच राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.