पगडीशिवाय शीख बांधव अपूर्णच. शीख संस्कृतीत महत्वाची असलेल्या पगडीमुळे एक महिलेला जीवदान मिळाले. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्गावर झालेल्या अपघातानंतर महिलेला वाचवण्यासाठी शिख युवकाने आपली पगडीची पट्टी करून माणूसकीचे दर्शन घडवले. राज्य महामार्गावर अपघात झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी तरूणांने कशाच विचार न करता आपली पगडी सोडली आणि त्याची पट्टी करून बांधली. सोशल मीडियावर सध्या याची जोरदार चर्चा आहे. नेटीझन्स त्या युवकावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. मंजित सिंह असे त्या तरूण युवकाचे नाव आहे.
राज्यमार्गावर अवंतीपोरा येथे वेगाने येणाऱ्या ट्रकने महिलेला टक्कर मारली. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर ट्रक चालक लगेच पसार झाला. रक्ताच्या थोराळ्यात रस्त्याच्या बाजूला पडलेल्या महिलेच्या मदतीला कोणीही आले नाही. गर्दीमध्ये उभा असलेला २० वर्षीय मंजीत पुढे आला. रक्तस्राव थांबवण्यासाठी मंजीतने आपली पगडी काढून महिलेच्या जखमेवर बांधली. पट्टीप्रमाणे मंजीतने जखमेवर पगडी बांधून रक्तस्राव थांबवला. त्यानंतर रूग्णालयात पोहचवलं. महिलेला रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मंजीतचे कौतूक केले. आणि योग्य वेळेवर पगडी बांधल्यामुळे महिलेचे प्राण वाचल्याचे मंजीतला सांगितले. सध्या त्या महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
‘गर्दीला पाहून मी काय झाले पाहण्यासाठी तिथे गेलो. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिला पाहून मला रहावलं नाही. पगडी आमच्या धर्माची आस्था आणि शान आहे. पण त्या महिलेचा मृत्यू झाला असता तर ही आस्था आणि शान राहिली असती का? गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आपलं सर्वस्व बहाल करण्याची शिक्षा गुरूंनी दिली आहे, असे मंजीत म्हणाला.’