दहीहंडी हा प्रत्येक मराठी माणसासाठी एक आनंदाचा, उत्साहाचा सण असतो. गणोशोत्सवाआधी मुंबईकर कोणत्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतील, तर तो म्हणजे दहीहंडी. या सणानिमित्त बाळगोपाळ एकत्र येऊन महिनाभराच्या सरावानंतर उंचच उंच मानवी मनोरे रचतात. जेवढे जमतील तेवढे थर लावण्याचा प्रयत्न करतात. मुंबईत आज श्रीकृष्ण जन्माष्टमीची धामधूम सुरू आहे. आज रात्री १२ वाजता बाळकृष्णाला पाळण्यात बसवून पूजले जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी सोहळ्याचा जल्लोष सुरू होईल. त्यासाठी बालगोपाळ मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या जोशाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्याही तयार आहेत. आपण मुंबई आणि परिसरातील पाच प्रसिद्ध आणि मानाच्या दहीहंड्यांविषयी जाणून घेणार आहोत.
संकल्प प्रतिष्ठान, जांबोरी मैदान, वरळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या ‘श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून वरळीत मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. वरळीतील जी. एम. भोसले मार्गावरील जांबोरी मैदानावर ही दहीहंडी बांधली जाते. ही दक्षिण मुंबईची सर्वांत उंच आणि मानाची दहहंडी मानली जाते. या दहीहंडीला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहत असल्याने ही दहीहंडी प्रसिद्ध आहे.
संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे
शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’मार्फत बांधण्यात येणारी दहीहंडी म्हणजे ठाण्यातील एक प्रसिद्ध दहीहंडी महोत्सव आहे. गेल्या काही वर्षांत या महोत्सवाने एक प्रभावी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. २०१२ मध्ये जय जवान गोविंदा मंडळाने येथे ४३.७९ फूट आणि ९ थरांचा मानवी मनोरा रचून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नाव नोंदवले, तेव्हापासून दरवर्षी होणारा हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी बॉलीवूड आणि राजकारणातील सर्व सेलिब्रिटी येथे पोहोचतात. ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर भागातील महापालिकेच्या शाळा परिसरात याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत येथील बक्षिसांची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. यावेळी प्रताप सरनाईक यांनी २१ लाखांचे बक्षीस ठेवले आहे.
मागाठाणे दहीहंडी, बोरिवली
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. ही राजकीय दहीहंडी असल्याने येथे हंडी फोडण्यासाठी मुंबईभरातून गोविंदांचे संघ पोहोचतात. दरवर्षी लाखोंची बक्षिसेही येथे ठेवली जातात. गेल्या महोत्सवात येथे ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. येथे टीव्ही आणि बॉलीवूड जगतातील सेलिब्रिटीही दरवर्षी सहभागी होतात.
छबिलदास लेन, दादर
मुंबईतील दादर परिसरात साजरा होणारा हा दहीहंडी उत्सव सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव आहे. येथे फक्त तरुण गोविंदांचीच पथके नाही, तर तरुणींच्या पथकेही मटकी फोडण्याचे प्रयत्न करतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. आतापर्यंत येथे ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे कॉलनी येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सर्वांत लक्षवेधी दहीहंडी म्हणून या दहीहंडीचा नावलौकिक आहे. मुंबईतील अनेक मोठ्या दहीहंडी पथकांना येथे येण्यासाठी खास आमंत्रण दिले जाते. तसेच ही हंडी मुंबईच्या जवळ असल्याने इथे बाळगोपाळांसह बघ्यांची मोठी गर्दी असते.