जापानची राजधानी टोकियोजवळ बुधवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे एकच खळबळ उडाली आहे. भूकंपामुळे २ जणांचा मृत्यू झाला असून ८८ जण जखमी झाले आहे. यानंतर जापानच्या हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ मोजली गेली. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू टोकियोच्या वायव्येस २९७ किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर राजधानी आणि इतरत्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक घरांची वीज खंडीत झाली. मियागी आणि फुकुशिमा भागातील सुमारे ३५,६०० घरांमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत वीज नसल्याची माहिती वीज कंपनी TEPCO ने दिली आहे. जापानच्या हवामान खात्याने देशाच्या उत्तर-पूर्व भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंपाच्या प्रभावामुळे फुकुशिमाच्या किनाऱ्यावर तीन फुटांपर्यंत लाटा उसळू शकतात, असंही सांगितलं आहे. इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे बुलेट ट्रेन रुळावरून घसरली. यावरून भूकंपाची तीव्रता लक्षात येते. ट्रेनमध्ये जवळपास १०० लोक होते. सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही. जपानच्या ईस्ट निप्पॉन कंपनीच्या म्हणण्यानुसार, भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर अनेक एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक बुलेट ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार नुकसानीग्रस्त भागात मदत पोहोचवण्याचं काम करत आहे. तसेच जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. “कृपया पहिल्यांदा लोकांचे जीव वाचवण्याचं काम करा,” असं ट्वीट पंतप्रधान किशिदा यांनी केलं आहे.
११ मार्च २०११ रोजी जापानमध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता ९ रिश्टर स्केल होती. ईशान्य किनारपट्टीवर झालेल्या भूकंपामुळे मोठी त्सुनामी आली होती. यात हजारो लोकांचा जीव गेला होता.