माणसाला घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील नागरिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या त्या देशातील सरकार प्रयत्न करत असते. पण सध्या जपानमधल्या एका गावात जपान रेल्वे प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याचे जगभर कौतुक होत आहे. जपानमधल्या एका गावातील रेल्वे सेवा प्रवासी नसल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला होता. परंतु या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर शाळेत जाणारी एक मुलगी नियमितपणे करते हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. जर ही सेवा बंद झाली तर त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते त्यामुळे प्रवासी नसतानाही फक्त त्या मुलीसाठी जपान रेल्वेने सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
वाचा : अंध दाम्पत्याच्या ‘डोळस’ मुलीच्या ‘त्या’ फोटोमागचं ‘व्हायरल सत्य’ जाणून घ्या!
जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन आहे. येथे प्रवासी नसल्याने या स्टेशनवरची रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय जपान रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण या स्टेशनवरून एक मुलगी रोज शाळेत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू ठेवली होती. या मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रेल्वेचे नुकसान होत असताना देखील हा निर्णय घेण्यात आला. काहीही झाले तरी या मुलीचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जपानमध्ये फक्त एका प्रवाशासाठी ही ट्रेन सुरू होती. मार्च २०१६ मध्ये या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या गावातील रेल्वे सेवा आतापूर्णपणे बंद झाली आहे. जपान रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची वेळ या मुलीच्या शाळेच्या वेळेप्रमाणे ठरवली होती. ती सांगेल तेव्हा ही वेळ बदलण्यात यायची. जपानमधील शिक्षणाला प्राधान्य देण्याचा या निर्णयाची गोष्ट आज इंटरनेटवर फिरत आहे. या निर्णयातून खरेच शिकण्यासारखे आहे.
वाचा : लाखो तरुणींना घायाळ करणाऱ्या पाकिस्तानी चहावाल्याचं सत्य उघड!