Japan Ambassador enjoys Kachori And Jalebi In Varanasi : भारतातील जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांचे भारतीय खाद्यपदार्थांवरील प्रेम काही नवीन नाही. भारतात आल्यापासून अनेकदा ते विविध भारतीय खाद्यपदार्थ आवडीने चाखतानाचे व्हिडीओ पोस्ट करीत असतात. अशात त्यांनी आणखी एक नवा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे; ज्यात जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी वाराणसीमधील लोकप्रिय स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
सुझुकी यांनी शनिवारी पत्नी इको सुझुकीबरोबर बनारसीच्या रस्त्यावर कचोरी-भाजी आणि जिलेबीचा आस्वाद घेताना दिसले. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये हिरोशी यांनी लिहिलेय, “वाराणसीमध्ये स्ट्रीट फूडचा आनंद घेत आहे.”
यापूर्वी सुझुकी यांनी पत्नीबरोबर एक फोटो शेअर केला होता; जो गंगा घाटाच्या काठावर काढण्यात आला होता. दरम्यान, जपानचे राजदूत खाण्याचे शौकीन आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर खाद्यपदार्थांशी संबंधित पोस्ट शेअर करताना दिसतात.
जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांची २०२२ मध्ये भारतात नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते सोशल मीडियावर अनेकदा इथले विविध खाद्यपदार्थ खाण्याचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करतात. अनेकदा त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी इको सुझुकीदेखील दिसते.
त्यात वाराणसीची ही त्यांची पहिली भेट नाही. या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यातही त्यांनी वाराणसी शहराला भेट दिली होती आणि गोल गप्पा, बाती चोखा व बनारसी थाळी यांसारख्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला होता.
हिरोशी सुझुकीने गेल्या वर्षी भारताला भेट दिली आणि भारतीय खाद्यपदार्थांविषयी प्रेम व्यक्त करीत ते सोशल मीडियावर चर्चेत आले. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी नवी दिल्लीच्या लोकप्रिय सरोजिनी नगर मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ खरेदीच केली नाही, तर बाजारात आलू टिक्की खाण्याचा आनंदही घेतला.
दरम्यान, जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदूत हिरोशी सुझुकी यांचा जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, ही एक स्पर्धा आहे; जी हरायला तुम्हाला हरकत नाही राजदूत सर! तुम्हाला भारतातील पाककलेच्या विविधतेचा आस्वाद घेताना आणि ते अशा नावीन्यपूर्ण पद्धतीने सादर करताना पाहून आनंद झाला.
जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये गोलगप्पा चाखतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.