आई ही शेवटी आई असते. ठेच मुलाला लागली तरी तिच्या डोळ्यातून पाणी येते. आपल्या मुलासाठी ती काहीही करु शकते. उपाशी राहू शकते, त्याच्यासाठी जगाविरुद्ध लढू शकते. प्राण्यांच्याही बाबतीत असेच असते. ते मुके असले म्हणून त्यांना भावाना नसतात असे नाही. प्राण्यामध्येही मातृत्त्व असते. म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोणाचेही हृदय पिळवटून काढेल. समुद्रातील एका डॉल्फीनच्या पिल्लाला काही तस्कर आईपासून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते. या आईने अगदी शेवटपर्यंत या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मानवाच्या क्रुरतेपुढे या मुक्या जीवाने हार मानली अन् त्यांची कायमची ताटातूट झाली.
वाचा : अजगर पकडण्यासाठी खास भारतातून बोलावले गारूडी, ४६ लाख पगार
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी लिज कार्टर नावाच्या व्यक्तीने डॉल्फिन शिकारीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. काही जापानी शिकारी समुद्रातून या डॉल्फिनला पकडून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी डॉल्फिनच्या पिल्लावर जाळे टाकून त्याला पकडून नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या आईने आपले प्राण धोक्यात घालून पाचही शिका-यांशी लढा दिला. अखेर मानवी क्रूरतेपुढे तिने हात टेकले. डॉल्फिन हा सगळ्यात संवेदनशील सस्तन प्राणी मानला जातो. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तो अधिक संवेदनशील असतो. तसेच हुषारही असतो त्यामुळे आपल्याच समुहातील एका छोट्या पिल्लाला शिकारी पळवून नेत आहेत हे पाहून इतरही डॉल्फिनने लढा दिला. पण ते मानवाच्या अमानुषपणापुढे काहीच करु शकले नाही.
लिज कार्टर यांनी हा व्हिडिओ शेअर करताना एक महत्त्वाची माहिती लिहिली. हे फक्त एक दुखद चित्र होते, पण जपानी शिका-यांनी आतापर्यंत तस्करीसाठी १०० डॉल्फिनची शिकार केली आहे. आणि यात सर्वाधिक डॉल्फिनची पिल्लेच आहेत. त्यामुळे आता या प्रकारावर आवाज उठवण्याचे आवाहान त्यांनी केले आहे. कदाचित आपल्यासाठी हे समुद्रातील नगण्य जीव असतील पण त्यांनाही भावना असतात आणि या प्राण्यांचेही आपल्या पिलावर तितकेच प्रेम असते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.