Jaya Kishori : प्रसिद्ध कथावाचक आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी रावणाबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची पुन्हा एकदा चांगलीच चर्चा रंगली आहे. रावण रेपिस्ट होता अर्थात रावण बलात्कारी होता असं जया किशोरी एका पॉडकास्ट मध्ये म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर लोक जया किशोरी ( Jaya Kishori ) यांच्या वक्तव्यावर विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत.
काय म्हणाल्या जया किशोरी?
“अनेक लोक असं म्हणतात की मला रामासारखं नाही तर रावणासारखं बनायचं आहे. कारण रामाने त्याच्या पत्नीचा म्हणजेच सीतेचा त्याग केला. तर रावणाने मात्र बहिणीचा जो अपमान झाला त्याचा बदला घेतला. रावण त्या अपमानाचा बदला घेता यावा म्हणून रामाशी युद्धही केलं. एवढंच नाही तर रावणाने कधीही परस्त्रीला हातही लावला नाही. त्यांना मी हे सांगेन की तुमचं वाचन वाढवा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रावण हा एक रेपिस्ट होता. एका अप्सरेवर त्याने बलात्कार केला होता. त्यानंतर ती अप्सरा ब्रह्मदेवाकडे गेली तिने तिची व्यथा सांगितली. यानंतर ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला की यापुढे तू कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श केलास तर तुझ्या शरीराची १०० शकलं होतील. त्यामुळे रावण स्त्रियांना स्पर्श करत नव्हता. सीतामातेला त्याने नाईलाजाने स्पर्श केला नाही.” असं जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी म्हटलं आहे.
रावणाबाबतची पुराणात असलेली ही कथा नेमकी काय आहे?
पुराणातील कथेनुसार रावण कुबेराच्या घरासमोरुन जात होता. त्यावेळी त्याने रंभा नावाच्या अप्सरेला पाहिलं. रावण तिचं सौंदर्य पाहून मोहीत झाला आणि त्याने तू माझ्याबरोबर लंकेला चल असं त्याने रंभेला सांगितलं. रंभेने रावणाला सांगितलं की मी तुझ्या भावाची म्हणजेच कुबेराची सून आहे, त्यामुळे तुझीही सूनच आहे. मात्र रावणाने तिचं ऐकलं नाही तिच्यावर बळजबरी केली. यानंतर रंभा ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला अशी कथा सांगितली जाते. हा उल्लेख जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी एका पॉडकास्टमध्ये केला आहे. यावरुन लोक त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
लग्न का टिकत नाहीत यावरही जया किशोरींचं भाष्य
दरम्यान जया किशोरी यांनी लग्न का टिकत नाहीत? याचीही कारणं सांगितली. जया किशोरी म्हणाल्या लोक अनेकदा नातं टिकवण्यावर लक्ष केंद्रीत करत नाहीत. अनेकदा लोक लग्नही घाईने करतात. लग्नात आलेल्या भटजींना सांगतात की लग्न लवकर लावून द्या आम्हाला पार्टी करायची आहे. लग्नात ज्या ठिकाणी देवाची मूर्ती आहे तिथेच मद्याचं सेवन केलं जातं आणि मग लोक म्हणतात की आमचं लग्न टिकत नाही. लोक त्यांच्या लग्नाबाबत गंभीर नसतात, नात्यांबाबत गंभीर नसतात मग ते नातं कसं काय टिकेल? असाही प्रश्न जया किशोरी ( Jaya Kishori ) यांनी विचारला.