‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. वॉल स्ट्रीट म्हणजेच अमेरिकी शेअर बाजाराने उसळी खाल्ल्याने बेजोस हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे. ‘फोर्ब्स’च्या ‘रियल-टाइम बिलेनियर्स इंडेक्स’नुसार बेजोस यांनी लुईस वेटनर्सचे बरनार्ड अरनॉल्ड आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांना मागे टाकलं आहे. १६ सप्टेंबरपासून बेजोस हे या यादीत चौथ्या स्थानी होते. त्यांच्या संपत्तीमध्ये आज ३.६ बिलियन अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती १४१.४ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे.

अमेरिकी शेअर बाजारामध्ये विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याने अनेक अमेरिकी श्रीमंत व्यक्तींना फटका बसला आहे. अमेरिकन केंद्रीय वित्तीय संस्थ असणाऱ्या फेडर रिझर्व्हकडून महागाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चेमुळे गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेत आहेत. मागील सहा दिवसांपासून अमेरिकी शेअर बाजारामध्ये पडझड होत आहे.

अमेरिकन शेअर बाजारामध्ये ही पडझड झाल्याने त्याचा फटका श्रीमंत व्यक्तींना बसला आहे. त्यामुळेच आता बेजोस आणि श्रीमंकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या बरनार्ड यांच्यामध्ये केवळ १.४ बिलीयन अमेरिकी डॉलर्सचा फरक आहे. बरनार्ड यांची एकूण संपत्ती १४०.४ बिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार अदानी श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी घसरले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता १३९.१ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. अदानी यांच्या संपत्तीमध्ये आज दिवसभरामध्ये ७९६ बिलीयन अमेरिकी डॉलर्सची (सध्याच्या डॉलरच्या दरानुसार ६ हजार ५१० कोटी रुपये) घसरण झाली. मागील आठवड्याभरापासून या यादीमध्ये मोठे चढ उतार पहायला मिळत आहेत. अदानी हे मागील आठवड्यात दुसऱ्या स्थानी होते. नंतर ते तिसऱ्या आणि आज चौथ्या स्थानी घसरले आहेत.

इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २६३.२ बिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.

Story img Loader